वाल्हे-हरणी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’; सुदैवाने जीवितहानी टळली | पुढारी

वाल्हे-हरणी रस्त्यावर ‘द बर्निंग कार’; सुदैवाने जीवितहानी टळली

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : इंजिनजवळील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या मोटारीने पेट घेतला. सुदैवाने चारचाकीमधील दोघेजण बचावले; मात्र मोटारीचे मोठे नुकसान झाले. वाल्हे-राऊतवाडी मार्गावरील हरणी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत सोमवारी (दि. 1) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

बारामती तालुक्यातील जोगवडी येथील मनोज जगन्नाथ भोसले व त्यांचा भाचा अथर्व संजय गुळूमकर हे स्कोडा सुपरब या मोटारीमधून (एमएच 03 बीबी 1666) वीर येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना हरणी गावच्या हद्दीत अचानक मोटारीच्या इंजिनमधून धूर येऊ लागला. त्यांनी तत्काळ मोटार रस्त्यालगत घेतली आणि ते मोटारीतून बाहेर पडले. तेवढ्यात संपूर्ण मोटारीला आगीने वेढले.

या घटनेची माहिती वाल्हे पोलिस दूरक्षेत्रात देण्यात आली. दुर्घटना झालेले ठिकाण हे निर्जन असल्याने त्या ठिकाणी भोसले व गुळूमकर यांना तत्काळ मदत मिळू शकली नाही. त्यामुळे मोटार जळून खाक झाली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. इंजिनजवळील वायर्समध्ये शॉर्टसर्किट झाल्याने मोटारीला आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button