खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी | पुढारी

खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहतूक कोंडी

खेड शिवापूर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : शनिवार, रविवार व सोमवार अशा सलग तीन सुट्यांमुळे बाहेरगावी गेलेले नागरिक, पर्यटक पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाल्याने खेड शिवापूर टोल नाक्यावर मंगळवारी (दि. 2) सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनाला टोल नाका पास करण्यासाठी जवळपास आर्धा तास लागत होता. त्याचा नागरिकांसह इतर वाहनचालक, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

शनिवार (दि. 29) पासून मिळालेल्या सुटीचा फायदा घेत अनेक नागरिक पर्यटनासाठी शुक्रवारी रात्रीच बाहेर पडले होते. मंगळवारी कामावर हजर होण्यासाठी सोमवारी दुपारनंतर पर्यटक शहरात परतत होते. खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहने कासवगतीने पुढे सरकत होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा रात्री उशिरापर्यंत लागल्या होत्या. याशिवाय भोर, मांढरदेवी येथून येणार्‍या भाविकांच्या वाहनांबरोबरच जेजुरी, नसरापूर, केतकावळे येथील बालाजीचे दर्शन घेऊन घरी परतणार्‍या वाहनांची त्यात भर पडली. परिणामी, वाहनांच्या रांगा खेड शिवापूर टोल नाक्यावर लागल्या होत्या. उशिरापर्यंत या भागातील वाहतुकीची कोंडी सुटली नव्हती.

Back to top button