दिवे : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव; पाणवठे आटले | पुढारी

दिवे : वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव; पाणवठे आटले

दिवे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दिवे परिसरात डोंगरमाथ्यावरील जवळपास सर्वच पाणवठे आटले आहेत. परिणामी, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळत आहे. मधल्या काळात डोंगराला लागलेल्या वणव्यामुळे चारा संपुष्टात आला होता. आता पाण्यासाठी प्राण्यांची भटकंती पाहायला मिळत आहे.

विशेषत: रात्री प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात. खंबाईमाता मंदिराच्या पायथ्याशी मधल्या काळात पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी पैसे भरून पाणी घेतले होते. काही शेतकर्‍यांनी पाण्यासाठी शेततळ्याची उभारणी केली आहे. शेततळ्याच्या माध्यमातून काही शेतकर्‍यांनी नगदी पिके घेतली आहेत. रात्रीच्या वेळी वन्यप्राणी या पिकांचा फडशा पाडत आहेत.

परिणामी, शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वन विभागाने अथवा इतर सामाजिक संस्थांनी कृत्रिम पाणवठे तयार करून या प्राण्यांची तहान भागविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. पिकांचे संरक्षण करण्यासाठी काही शेतकरी अक्षरशः रात्रभर पहारा देत आहेत. तर काही शेतकरी जुन्या साड्यांचा वापर करून आपल्या पिकांचे संरक्षण करीत आहेत. सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, त्यामुळे होणारी रोगराई; तर दुसरीकडे वन्यप्राण्यांचा त्रास, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

Back to top button