बावडा : टणूत एकर मकवानाचा खड्डा पद्धतीने मुरघास | पुढारी

बावडा : टणूत एकर मकवानाचा खड्डा पद्धतीने मुरघास

बावडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दूध उत्पादक शेतकर्‍यांना मुरघास हा जनावरांना वर्षभर चारा म्हणून उपलब्ध होत असल्याने वरदान ठरत आहे. टणू (ता. इंदापूर) येथे प्रगतिशील दूध उत्पादक शेतकरी शरद श्रीधर जगदाळे-पाटील यांनी तब्बल 6 एकर क्षेत्रावरील मकवानाचा मुरघास हा खड्डा पद्धतीने तयार करून साठवणूक केली आहे.

इंदापूर तालुक्यात गेल्या चार-पाच वर्षांपासून मुरघास तयार करून त्याचा वर्षभर चारा म्हणून वापर करण्याकडे बहुतांशी शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. जमिनीमध्ये खड्डा पद्धतीने चा-याची साठवणूक करून अथवा प्लॅस्टिक बॅगमध्ये साठवून दूध उत्पादक शेतकरी हे चारा टंचाईवर यशस्वीपणे मात करीत आहे.

इंदापूर तालुक्यात मका पीक वर्षभर तिन्ही हंगामात मुबलक प्रमाणावर घेतले जात आहे. टणू येथील शरद श्रीधर जगदाळे-पाटील यांचा 36 गायींचा मुक्त पद्धतीचा गोठा आहे. तेथे दररोज सुमारे 250 लिटर दुधाचे उत्पादन निघते. जनावरांना वर्षभर चारा उपलब्ध व्हावा म्हणून त्यांनी जमिनीमध्ये 16 फूट रुंद द्ब 25 फूट लांब व 5 फूट खोल खड्डा तयार करून त्यावर पॉलिथिन पेपर अंथरला.

त्यानंतर घरच्या 6 एकर क्षेत्रावरील ओल्या मकवानाची कुट्टी करून त्यावर कल्चर टाकून मुरघास प्लॅस्टिकने झाकून हवाबंद केला आहे. त्यांना यासाठी 4 दिवस लागले. 45 ते 60 दिवसांनी जनावरांना खाण्यायोग्य मुरघास तयार होईल. जनावरांना पूर्वी वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होत नव्हता. मात्र आता मुरघास तयार करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढल्याने जनावरांसाठी हिरव्या चार्‍याची टंचाई दूर झाल्याचे जगदाळे-पाटील यांनी नमूद केले.

Back to top button