पुणे : दागिना गहाळ झाला अन् चोरीचा मामला आला समोर | पुढारी

पुणे : दागिना गहाळ झाला अन् चोरीचा मामला आला समोर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चोरी केल्यानंतर चोर मागे कोणताही पुरावा ठेवत नसल्याचा भास त्याला होत असतो. मात्र, कधी ना कधी हा प्रकार चव्हाट्यावर येतोच. असाच प्रकार पुणे शहरातील एका प्रसिध्द सराफी पेढीत उघडकीस आला. त्याचे झाले असे की, यापूर्वी वेळोवेळी 35 दागिने लंपास केले. मात्र 36 वा दागिना गहाळ झाल्याचा प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आला अन् चोरीचे बिंग फुटले.

पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक चंदुकाका सराफ अ‍ॅण्ड सन्स दुकानातील तब्बल 1 किलो 246 ग्रॅम म्हणजे 79 लाख 38 हजार 420 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी महिला कर्मचार्‍यासह दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांनी या सोन्याचा अपहार करून त्या सोन्यावर एका सोने तारण कंपनीकडून 45 लाखांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोमल अनिल केदारी (24, रा. नाना पेठ) आणि सागर सूर्यकांत नकाते (32, रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत व्यवस्थापक ओंकार तिवारी (29, रा. वृंदावन सोसायटी, चर्‍होली खुर्द, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली. कोमल आणि सागर हे संबंधित सराफी दुकानात आवक-जावक विभागात नोकरीस होते.

त्यांनी येथे नोकरी करताना संगनमत करून पैशाच्या हव्यासापोटी एक एक दागिना करत तब्बल 36 दागिने लंपास केले. मात्र, नुकताच दागिन्यांची तपासणी करताना त्यांना एक दागिना नसल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर त्यांनी सर्व दागिन्यांची तपासणी केली असता तब्बल 36 दागिने नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

तब्बल 1 किलो 246 ग्रॅम दागिन्यांचा अपहार करत वेगवेगळ्या फायनान्स कंपन्यांकडून त्यांनी कर्ज काढल्याचा प्रकार या निमित्ताने समोर आल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते 26 एप्रिल 2023 दरम्यान घडला. त्यांना न्यायालयाने 1 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहायक पोलिस निरीक्षक सारिका जगताप पुढील तपास करत आहे.

Back to top button