Loksabha election | पुण्यात कोण बाजी मारणार? काय सांगतात आकडे?

Loksabha election | पुण्यात कोण बाजी मारणार? काय सांगतात आकडे?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. मतदानानंतर कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघात किती चालला, याचीच चर्चा रंगली आहे. तरीही निकालात प्रामुख्याने सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या वडगाव शेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील मताधिक्य निर्णायक ठरणार असून, त्यावरच पुण्याचा खासदार कोण? हे ठरणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 53.54 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास साडेतीन टक्क्यांनी मतांचा टक्का वाढला. त्यात कसबा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 59.54 टक्के, त्यापाठोपाठ पर्वती मतदारसंघात 55.47 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट 53.13 टक्के, कोथरूडमध्ये 52.43 टक्के, वडगाव शेरीत 51. 71 टक्के आणि शिवाजीनगरमध्ये 50.67 टक्के इतके मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास सर्वच मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला आहे. यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या कसबा पेठ मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. या घरच्या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळेल, असा धंगेकर यांचा दावा आहे.

मात्र, पोटनिवडणुकीत मतदानापासून लांब राहिलेला भाजपचा मतदार या निवडणुकीत मतदानासाठी उतरला असल्याचा दावा त्या पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मताचा टक्का वाढला असून, हा वाढलेला टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे धंगेकर या ठिकाणी अपेक्षित मताधिक्य घेतील का? हे पाहावे लागेल. तर, भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात गतवेळेपेक्षा दोन टक्क्यांनी मतदान वाढले. मोहोळ यांनी या मतदारसंघात मोठे मताधिक्य घेण्याचे नियोजन ठेवले होते. त्यानुसार ते या ठिकाणी निर्णायक आघाडी घेतील, अशी शक्यता आहे. तर, शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ काँग्रेसला अनुकूल असा मानला जातो. या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसला अधिकाधिक मताधिक्याची अपेक्षा आहे.

काही प्रमाणात या ठिकाणी काँग्रेसला मताधिक्यही मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. तर, भाजपच्या बाजूने कायम झुकलेल्या पर्वती मतदारसंघाकडून मोहोळ यांना मोठी आशा आहे. कोथरूडपाठोपाठ पर्वतीमधील मताधिक्य विजयाचा टप्पा पार करण्यास भाजपला मोठा मदतीचा ठरू शकतो. मात्र, या मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद एकवटली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपला अपेक्षित यश या ठिकाणी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व मतदारसंघांत वडगाव शेरी हा सर्वांत निर्णायक असा मानला जात आहे.

या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच दोन लाख 41 हजार इतके मतदान झाले. या मतदारसंघात काँग्रेस, भाजपसह वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचाही हक्काचा मतदार आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी मोठी अपेक्षा आहे. काँग्रेसची मदार प्रामुख्याने झोपडपट्या आणि वस्ती भागात असून, भाजपची मदार ही सोसायट्यांमधील मतदारांवर आहे. या ठिकाणी मताधिक्य घेऊन भाजपला धक्का देण्याचे काँग्रेसचे नियोजन होते, तर या मतदारसंघातील महायुतीच्या माध्यमातून एका बाजूला असलेल्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या माध्यमातून चांगले मताधिक्य मिळेल, असा भाजपचा अंदाज आहे. मात्र, या ठिकाणी चांगलीच 'काँटे की टक्कर' पाहायला मिळाली. त्यात जो उमेदवार मताधिक्य घेईल, तो निवडणुकीत निर्णायक ठरेल, अशीच चर्चा आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news