मंचर : हद्दीच्या वादात रुग्णाचे हाल ! रुग्णवाहिका चालकांचे रस्त्यातच भांडण | पुढारी

मंचर : हद्दीच्या वादात रुग्णाचे हाल ! रुग्णवाहिका चालकांचे रस्त्यातच भांडण

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शेतीच्या हद्दीवरून अनेकदा भांडणे होत असतात. परंतु, मंचरला हद्दीवरून रुग्णवाहिका चालकांमध्ये चांगलाच वाद रंगला. वाद थांबत नसल्याचे पाहून नागरिकांनी संबंधित रुग्णास खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. कळंब (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 27) सकाळी ही घटना घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास नाशिकवरून मालवाहतूक करणारा टेंपो पुण्याच्या दिशेने चालला होता. कळंब येथे टेंपोचा अपघात झाला. त्यात टेंपोचालक केबिनमध्ये अडकला. स्थानिक नागरिकांनी त्यास टेंपोतून बाहेर काढत नारायणगाव येथील एका रुग्णवाहिका चालकाला माहिती दिली. नारायणगाव येथील रुग्णवाहिका चालकाने घटनास्थळी येत जखमीला रुग्णालयात नेण्यासाठी स्ट्रेचरवर ठेवले. तितक्यात मंचर येथील एक रुग्णवाहिका चालक तेथे आला.

त्याने नारायणगाव येथील रुग्णवाहिका चालकाशी हद्दीवरून वाद घालण्यास सुरुवात केली. त्या वेळी रुग्ण वेदनेने विव्हळत होता. रुग्णाला तत्काळ रुग्णालयात नेणे गरजेचे असताना त्याला जागेवर सोडून रुग्णवाहिका चालक एकमेकांशी भांडत होते. जखमी रुग्णास तातडीने रुग्णालयात घेऊन जाणे गरजेचे होते.

या दोघांचे भांडण संपणार नाही, हे लक्षात येताच नागरिकांनी खासगी वाहनाने रुग्णास रुग्णालयात दखल केले. या घटनेने काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. अनेक रुग्णवाहिका चालक सात ते आठ किलोमीटरच्या परिसरात अपघात झाल्यास जादा भाडे आकारून रुग्णांची लूट करीत असल्याचे एका रुग्णवाहिका चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

Back to top button