पुणे जिल्ह्यातील बेकायदा होर्डिंगवर करवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश | पुढारी

पुणे जिल्ह्यातील बेकायदा होर्डिंगवर करवाई करा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रावेत येथील जाहिरात फलक (होर्डिंग) कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांनी बेकायदा होर्डिंग विरोधात कारवाई सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेकायदा होर्डिंगवर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी दिला.

जिल्हाधिकारी देशमुख यांच्या आदेशात जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत अधिकार्‍यांनी तात्काळ होर्डिंगबाबत कारवाई करण्याचे म्हटले आहे. तालुक्यातील संबंधित गटविकास अधिकारी आणि नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी स्थापत्य अभियंत्याने प्रमाणित केलेला दाखला सादर केल्यानंतरच होर्डिंग उभारणीसाठी परवानगी देण्यात येते. सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस आणि आगामी पावसाळयात सर्व होर्डिंगचे स्थापत्यविषयक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडीट) पुन्हा नव्याने करून घेण्यात यावे.

लेखापरीक्षण केल्याचा दाखला 15 दिवसांत सादर करण्याबाबत कार्यवाही करावी. ग्रामीण भागातील स्थापत्य विषयक लेखापरीक्षण न केलेली होर्डिंग अनधिकृत समजून संबंधित गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांनी नोटीस देऊन तातडीने काढून टाकावीत. तसेच सर्व बेकायदा होर्डिंगवर कडक कारवाई करावी. प्रामुख्याने धोकादायक, वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या होर्डिंगवर तातडीने कारवाई करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्यामार्फत नव्याने स्थापत्यविषयक लेखापरीक्षण केल्याचा प्रमाणित दाखला सादर न केल्यास देण्यात आलेल्या नोटीस, प्रत्यक्ष केलेली कारवाई याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.

Back to top button