पुणे : म्हाडा अधिकार्‍यांना लाभार्थ्यांचा घेराव | पुढारी

पुणे : म्हाडा अधिकार्‍यांना लाभार्थ्यांचा घेराव

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र गृहनिर्माण विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुणे मंडळांच्या सोडतीसाठी नव्याने वापरण्यात आलेल्या इंटिग्रेटेड लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएलएमएस) 2.0 या सॉफ्टवेअरमुळे लॉटरीत विजेते ठरलेल्या नागरिकांना करार पत्र मिळालेले नाही. तसेच, म्हाडाने आपल्या तळेगाव येथील प्रकल्पातील घरांच्या किमती वाढविल्यामुळे अधिकार्‍यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला. पुणे मंडळांतर्गत 2019 मध्ये तळेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 600 सदनिकांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील विजेत्यांकडून 10 टक्के रक्कम भरून देकरार पत्र देण्यात आले होते.

या प्रकल्पाचे बांधकाम सुरू असून, चटई क्षेत्रफळ वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सदनिकेची किंमत अडीच लाख रुपयांनी वाढली असून, या रकमेच्या मागणीसाठी नव्याने पत्र पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ताबा देण्याची मुदत करारानुसार संपत आली असताना अचानक वाढीव पैशाची मागणी केल्यामुळे म्हाडा कार्यालयात आंदोलन केले. या वेळी आंदोलकांकडून तीव— संताप व्यक्त करण्यात आला असून, अधिकारी आणि लाभार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. अखेर 10 मे (बुधवार) प्रकल्प अभियंता, विकसक आणि अधिकार्‍यांसोबत बैठकीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय विजेत्यांना देकरार पत्र वितरित करण्यासाठी प्रॉबिटी सॉफ्टवेअर प्रा. लि. या खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले. त्यानुसार जानेवारी महिन्यातच सहा हजार सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. परंतु, अर्ज भरण्यापासून कागदपत्रांची पडताळणी आदींमध्ये त्रुटी असताना सोडत तशीच सुरू ठेवली. मार्चमध्ये सोडतीचा निकाल जाहीर केला. तसेच, विजेत्यांकडून 10 टक्के रकमेचा भरणाही करून घेतला आहे. मात्र, देकरार पत्र प्राप्त झालेले नाही. विजेत्यांना सॉफ्टवेअर कंपनीकडून थेट संपर्क साधून पात्र ठरविण्यासाठी कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे सांगितले आहे.

Back to top button