भीमा कोरडीठाक ! खेडच्या पश्चिम भागात पाणीटंचाई | पुढारी

भीमा कोरडीठाक ! खेडच्या पश्चिम भागात पाणीटंचाई

वाडा : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरलेल्या चासकमान धरणची पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. परिणामी गावोगावची भीमा नदीचे पात्र कोरडे पडू लागले असून पाणीटंचाई भासू लागली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच या गावांत पाण्याची समस्या अधिक तीव— होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यापासून चासकमान धरणातून टप्प्याटप्प्याने कालव्याव्दारे पाण्याचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील खरोशी, एकलहरे, धामणगाव, डेहणे, शेंदुर्ली, वांजळे, धामणगाव, धुवोली, मोरोशी, शिरगाव, टोकावडे, मंदोशी, नायफड आदी गावांमधील भीमा नदीपात्रातील पाणीसाठा झपाट्याने संपुष्टात आला आहे. त्यातच नदीपात्रात असणार्‍या गावोगावच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. गेल्या 25 ते 28 वर्षांनंतर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत शासनाने ग्रामीण भागात जलजीवन मिशनअंतर्गत लाखो-करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून पाणीपुरवठा योजना सुरू केल्या आहेत. अनेक गावांत कामेदेखील सुरू तसेच पूर्णत्वास आली आहेत. मात्र, अनेक गावात उन्हाळ्यात पाण्याची हमखास टंचाई निर्माण होतेच आणि ग्रामस्थांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून भीमा नदीपात्रात या गावांच्या दरम्यान दोन बुडीत बंधारे उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

धरणांतर्गत बुडीत बंधार्‍यांची आवश्यकता
उन्हाळ्यात धरणाच्या आवर्तनाचे पाणी अडवल्यास नदीपात्रालगत असलेल्या गावोगावच्या पाणीपुरवठा विहिरींना फायदा होईल. विहिरींची पाण्याची पातळी कायम राहील व योजना पूर्णपणे कार्यरत राहतील. फायदा सर्व गावांना होईल. ग्रामस्थांनी धरणांतर्गत बुडीत बंधारे व्हावेत यासाठी मोर्चे, आंदोलन केली. मात्र, अद्याप त्याची कोणी दखल घेतलेली नाही.

Back to top button