जेजुरीतील होळकर तलावाला उतरतीकळा; झाडांमुळे भिंतींना तडे | पुढारी

जेजुरीतील होळकर तलावाला उतरतीकळा; झाडांमुळे भिंतींना तडे

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरीनगरीत राजमाता अहल्यादेवी होळकरांनी खंडोबा देवाच्या भक्तांसाठी शहराच्या पश्चिमेला भव्य तलावाची निर्मिती केली. परंतु, तलावाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने या तलावाला उतरतीकळा लागली आहे. तलावाच्या भिंतीलगत मोठी झाडे उगवल्याने भिंतीला तडे पडले आहेत. जेजुरी गडाच्या जीर्णोद्धाराचे काम 1770 साली पूर्ण झाले. 1790 साली मल्हारराव होळकर व गौतमीबाई यांच्या स्मरणार्थ होळकर तलावाकाठी मल्हार-गौतमेश्वराचे सुंदर रेखीव मंदिर बांधण्यात आले.

होळकर घराण्याने जेजुरीत भाविकांसाठी ज्या सुविधा निर्माण केल्या त्याचा फायदा आजही राज्याच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांना होत आहे. ऐतिहासिक चिंचेच्या बागेत दररोज हजारो भाविक देवकार्य करीत असतात. गेली अनेक पिढ्या होळकर तलावातील पाण्याचा वापर भाविक व नागरिक करीत होते. अलीकडील काळात या तलावाकडे दुर्लक्ष झाल्याने तलावातील पाण्याचा वापर थांबला आहे.

सोळा एकराच्या आयताकृती तलावाच्या भिंतीत अनेक झाडे उगवली आहेत. पिंपळ, कडूनिंब व इतर खुरटी झाडे भिंतीत उगवल्याने भिंतीला तडे गेले आहेत. ही झाडे आणखी मोठी झाल्यास भिंतीचे दगड कोसळण्याची शक्यता आहे. या तलावाची मालकी इंदोर होळकर ट्रस्टकडे आहे. या ट्रस्टचे तलावाकडे दुर्लक्ष झाले आहे. या तलावाचे सुशोभीकरण व्हावे यासाठी दै. ’पुढारी’ने सातत्याने बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

जेजुरी विकास आराखड्यात होळकर व पेशवे तलाव सुशोभीकरणाचा समावेश आहे. यासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. होळकर तलाव हे जेजुरी शहराचे वैभव असून, या तलावाकाठी उद्यानाचे काम सुरू आहे. तलावाचे सुशोभीकरण झाल्यास एक पर्यटनक्षेत्र म्हणून परिसराचा नावलौकिक होणार आहे. दरम्यान, तलावाच्या भिंतीत उगवलेली झाडे काढून, तडे गेलेल्या भिंतींची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. तसेच चिंचेच्या बागेतून तलावात पडणारा प्लास्टिक कचरा काढून जलप्रदूषण थांबविण्याची मागणी होत आहे.

Back to top button