खडकी-बोपोडीदरम्यान वाहतूक कोंडी; वाहनचालक त्रस्त | पुढारी

खडकी-बोपोडीदरम्यान वाहतूक कोंडी; वाहनचालक त्रस्त

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : खडकी आणि बोपोडीमध्ये वारंवार होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असून विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे झाले आहे. या भागात दारुगोळा कारखाना, आर्मी वर्क्स शॉप, एचई फॅक्टरी, सीएफव्हिईडी यासारखे कारखाने आहेत.

त्यात काम करणारे अनेक कामगार खडकी, बोपोडी, दापोडी, कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, येरवडा, कळस, दिघी या भागातून कामासाठी येतात. त्यामुळे संध्याकाळी कामगारांची गर्दी वाढते. याबरोबरच पिंपरी-चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, तसेच येरवडा भागातून ये-जा करणारी वाहने या रस्त्याचा वापर करत असतात. वाहतूक कोंडीमुळे रस्ता ओलांडणे जिकिरीचे बनत आहे.

तसेच बोपोडी चौकातून पुण्याकडे जाणारा रस्ता मेट्रोच्या कामासाठी एकेरी केला असल्याने मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.
सध्या जून्या मुंबई-पुणे महामार्गावर खडकी रेल्वेस्टेशन दरम्यान मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे पिंपरीकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक दापोडी (हॅरिस पूल) पासून खडकीच्या दिशेने वळविण्यात आली आहे. खडकीतील आतील रस्ते लहान असल्याने खडकीबाजारापर्यंत रोज सकाळी व सायंकाळ मोठी वाहतूक कोंडी होते.

पिंपरी ते दापोडीदरम्यान ही मेट्रोचे काम सुरू आहे. परंतु येथील रस्ते मोठे, प्रशस्त आहेत. एका बाजूने तीन पदर आहेत. त्यातील मधला रस्ता बस व पीएमपीएमएल यांच्यासाठी बीआरटी (ग्रेडसेपरेडर) आहे. त्यामुळे दापोडीपर्यंतचा प्रवास हा सुखकर होतो. मात्र, पुढे बोपोडी व खडकी रेल्वेस्थानका दरम्यानचा रस्ता अरुंद असल्यामुळे येथे अनेक वर्षांपासून कोंडी होते. त्यात आता मेट्रोच्या कामाचं कारण झाले. सध्या पिंपरीहून शिवाजीनगर जाणार्‍या वाहनांची खडकी चौकात कोंडी होत आहे. या कोंडीमुळे दापोडी परिसरात महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

अतिक्रमणाचा प्रश्न पालिकेच्या मध्यस्थीने आणि नागरिकांच्या सहकार्याने मार्गी लागला आहे. मात्र, एक जुनी इमारत हटविण्याचे काम सुरू आहे. त्याच्यापुढील पुणे-मुंबई महामार्गाच्या कामाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याच्या सिमेंटीकरणाची सुरुवातही झाली आहे. सुमारे महिनाभरात या चौकातून खडकी स्टेशनकडे वाहतूक सुरळित होईल.

                   -प्रकाश मासाळकर, पोलिस निरीक्षक (वाहतूक

Back to top button