बाळाचा उकळत्या पाण्यात बुडवून हत्या करणारा आरोपी जेरबंद | पुढारी

बाळाचा उकळत्या पाण्यात बुडवून हत्या करणारा आरोपी जेरबंद

चाकण(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : शेलपिंपळगाव  येथील सव्वा वर्षाच्या बालकाच्या खुनातील फरार आरोपीस बहुळ (ता.खेड) येथून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. विक्रम कोळेकर (वय 23, रा. कोयाळी, ता. खेड ) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता गुरुवार (दि. 27) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.

लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून गुरुवारी (दि.6) सकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या बालकास विक्रमने बाथरूममधील गरम पाण्याच्या बादलीत बुडवले. त्यामध्ये ते गंभीररीत्या भाजले. त्याच्यावर ससून रुग्णालयात हॉस्पिटल, पुणे येथे उपचार चालू असताना दि.18 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. याबाबत चाकण पोलिस ठाण्यात रविवारी (दि. 23) खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दोन वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेतला. आरोपी बहुळ गावात आल्याचे पथकाला खबर्‍यांकडून समजले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलिस आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक गिरीश चामले, हवालदार यदु आढारी, सचिन मोरे, महेश भालचिंग आदींनी केली.

Back to top button