वडगाव मावळ : नवनियुक्त तहसीलदारांपुढे ‘आजी-माजीं’चा समतोल राखण्याचे आव्हान ! | पुढारी

वडगाव मावळ : नवनियुक्त तहसीलदारांपुढे ‘आजी-माजीं’चा समतोल राखण्याचे आव्हान !

गणेश विनोदे

वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केलेले काम व त्यांची गडचिरोली येथे झालेली बदली पाहता नवनियुक्त तहसीलदार विक्रम देशमुख यांच्यापुढे महसूल विभागातील दैनंदिन कामापेक्षा आजी-माजी आमदारांचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान असल्याचे दिसते.

तहसीलदार बर्गे यांच्या कोरोना काळातील कामांचे कौतुक
तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी जवळपास पावणेचार वर्षे तालुक्याची जबाबदारी सांभाळली. या काळात दोन ते अडीच वर्षांचा काळ हा कोरोना महामारीचा होता. तहसीलदार बर्गे यांनी कोरोना महामारीच्या संकटात तालुक्याचे पालक म्हणून अतिशय जबाबदारीने काम केले. यामध्ये प्रामुख्याने 100 टक्के कोविड तपासण्या, लोकसहभागातून किराणा किट, शिधावाटप, अन्न वाटप यावर विशेष लक्ष दिले.

नुुकसानग्रस्तांना मिळवून दिली मदत
रुग्णांना आवश्यकतेनुसार व्हेंटिलेटर, इंजेक्शन उपलब्ध करून देणे, मजुरांना त्यांचा गावाला जाण्यासाठी व्यवस्था करणे, रुग्णालयातील बिलांचे ऑडिट करणे, बिलांमध्ये सवलत मिळवून देणे, यापद्धतीने विविध कामांच्या माध्यमातून कोरोना संकटात नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी तहसीलदार बर्गे यांनी सांभाळली.

याशिवाय निसर्ग व तोक्ते अशा दोन वेळा झालेल्या चक्रीवादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणे, लोकसहभागातून 190 पाणंद रस्त्यांची कामे, शासन आपल्या दारी अंतर्गत 67 मेळावे घेऊन दुर्गम भागातील लोकांना विविध शासकीय लाभ, दाखले मिळवून देणे, वडगाव शहराजवळील डोंगरवाडी येथे रस्ता नेण्यासाठी प्रयत्न आदी कामे केली.

कामांचा डोंगर
मावळचे तहसीलदार म्हणून काम करताना देशमुख यांना महसूल विभागातील दैनंदिन कामांसह रेशनिंग वाटप, अवैध गौण खनिज उत्खनन, प्रलंबित असलेल्या केसेस मार्गी लावणे, दुर्गम भागातील नागरिकांना विविध शासकीय लाभ मिळवून देणे, विविध दाखले उपलब्ध करून देणे या कामांवर लक्ष द्यावे लागणार आहे. याशिवाय, प्रामुख्याने तालुक्यातील आजी-माजी आमदारांचा समतोल राखत त्यांचा विश्वास संपादन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जबाबदारीने काम करूनही गडचिरोलीला बदली
दरम्यान, तालुक्यात आजी-माजी आमदारांचा समतोल साधत बर्गे यांनी महसूल विभागाची जबाबदारीही सांभाळण्याचा प्रयत्न केला. याकाळात राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे ते काही कामांच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या टीकेचे धनीही ठरले. एकंदर तहसीलदार म्हणून जबाबदारीने काम करूनही त्यांची गडचिरोली येथे बदली झाली हा मोठा चर्चेचा विषय ठरला.

सोन्याचा तुकडा म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यातील तहसीलदार पदाची खुर्ची मिळवण्यासाठी अनेक नावांची चर्चा होती. परंतु, संबंधित सगळी नावे बाजूला जाऊन नवनियुक्त तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळचे तहसीलदार म्हणून जबाबदारी मिळाली. यापूर्वी कर्जत येथे कार्यरत असलेले तहसीलदार देशमुख हे शांत व हुशार व्यक्तिमत्त्वाचे दिसतात.

Back to top button