मोशी, भोसरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग | पुढारी

मोशी, भोसरी, चिंचवडमध्ये सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 434 अनधिकृत जाहिरात होर्डिंग आहेत. कारवाईसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्या होर्डिंगवर महापालिकेस कारवाई करता येत नाही. त्यातील सर्वाधिक होर्डिंग मोशी, भोसरी, वाकड, चिंचवड, डुडुळगाव, चिखली, चर्‍होली या परिसरात आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत जाहिरात होर्डिंगवर कारवाईची धडक मोहीम हाती घेतली होती.

त्या विरोधात पिंपरी-चिंचवड होर्डिंग असोसिएशनचे मुंबई उच्च न्यायालयात पालिकेच्या विरोधात दावा दाखल केला होता. न्यायालयाने कारवाईबाबत जैथे थे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालिकेस त्या अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करता येत नाही. किवळे येथील होर्डिंग पडून 5 जणांचा बळी गेला. तर, 3 जण जखमी झाले आहेत. तेव्हापासून अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा शहरात गाजत आहे. पडलेले ते होर्डिंग 434 मधील एक आहे.

पालिका प्रशासनाने अनधिकृत, विनापरवाना व धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार गुरूवारी (दि.20) चार होर्डिंग काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेनंतर ते 434 होर्डिंग शहरात नेमके कोठे आहेत, यांची उत्सुकता लागली होती.

त्यातील सर्वांधिक 71 होर्डिंग मोशी परिसरात आहेत. भोसरी परिसरात 45 होडिर्ंग, वाकड व हिंजवडी रस्ता परिसरात 32, चिंचवड व चिंचवड स्टेशन परिसरात 29 होर्डिंग आहेत. डुडुळगाव परिसरात 27, चिखली परिसरात 27, चर्‍होली परिसरात 20 होर्डिंग उभे आहेत. रावेत परिसरात 21, आकुर्डीत 13, निगडी व प्राधिकरण परिसरात 16, किवळे परिसरात 13, वाल्हेकरवाडीत 2, रहाटणीत 11, पुनावळेत 17, काळेवाडी फाटा येथे 2, थेरगावाला 6 अनधिकृत होर्डिंग उभे आहेत. ताथवडेत 3, बेंगळूरू महामार्गावर 6, दापोडीत 5, पिंपरीत 8, फुगेवाडीत 3, नाशिक फाटा येथे 3, पिंपळे गुरवमध्ये 2, कासारवाडीत 3, सांगवीत 1, पिंपळे निलख येथे 6, पिंपळे सौदागर येथे 1, देहू-आळंदी रस्ता येथे 2, आळंदी रस्त्यावर 11, वडमुखवाडीत 7, दिघीत 6, बोर्‍हाडेवाडीत 2, चोविसावाडीत 1 आणि तळवडेत 14 अनधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंगचे आकार 20 फूट बाय 20 फूट ते 40 फूट बाय 40 फूट असे आहेत.

Back to top button