पिंपरखेड : कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक संकटात | पुढारी

पिंपरखेड : कवडीमोल दरामुळे कांदा उत्पादक संकटात

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला सध्या कवडीमोल दर मिळत आहे. कांद्याला प्रतवारीनुसार 50 ते 100 रुपये इतका दर मिळत आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवकाळीच्या वातावरणात शेतकरी विविध समस्यांना तोंड देत असताना घसरलेले बाजारभाव यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून काढणी केलेला कांदा शेतकर्‍यांच्या शेतातच पडून आहे.

या वर्षी खरिप कांद्याला कवडीमोल दर मिळाल्यानंतर रब्बी हंगामातील कांद्यालाही अपेक्षित दर न मिळाला नाही. यावर्षी कांद्याचे भाव समाधानकारक राहतील, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना होती. प्रतिकूल वातावरणात शेतकर्‍यांनी यशस्वी उत्पादन घेतले. सध्या या कांद्याची काढणी सुरू आहे. कांद्याला प्रती 10 किलोला प्रतवारीनुसार 50 ते 100 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा असताना कांद्याचे दर स्थिरच राहिल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. मोठा उत्पादन खर्च होऊन दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

चैत्र महिन्यातील उन्हाची काहिली, ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता निर्माण होत असल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडते. अवकाळी पाऊस, मजूर टंचाईच्या गर्तेत शेतकरी अडकला आहे. कांद्याचे दर घसरल्यामुळे शेतातच आरण लावून पात टाकून दररोज पावसाच्या भीतीने झाकण टाकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली. ज्या शेतकर्‍यांकडे साठवणूक व्यवस्था आहे त्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

टिकवण क्षमता खालावण्याची भीती
अवकाळी पावसाच्या या वातावरणात कडक उन्हाचा चटका, ढगाळ व दमट वातावरणात काढणी केलेल्या कांद्याची टिकवण क्षमता खालावण्याची शक्यता आहे. परिणामी, साठवणूक करताना शेतकर्‍यांकडून कोरडा कांदा वखारीत साठवणूक करण्यावर भर दिला जात आहे.

Back to top button