इंदापूर : मका काढणीस अडथळा; फळबाग उत्पादक चिंतेत | पुढारी

इंदापूर : मका काढणीस अडथळा; फळबाग उत्पादक चिंतेत

बावडा : पुढारी वृत्तसेवा :  इंदापूर तालुक्यात आठवडाभरामध्ये तीनवेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे मका पिकाच्या काढणी-मळणीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. या पिकाची काढणी केलेली कणसे शेतात पावसात भिजल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. इंदापूर तालुक्यात मका पीक हे वर्षभरातील तीनही हंगामांमध्ये घेतले जाते. या पिकाला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक आधार प्राप्त झाला आहे. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी मका पिकाची काढणी, कणसे वाळविणे, मळणी कामे चालू असल्याचे चित्र आहे.

मात्र, अवकाळी पावसाने या कामांमध्ये अडचण निर्माण झाल्याने मका उत्पादक शेतकरी त्रस्त झाल्याचे महेश शिर्के (वडापुरी), दीपक गुळवे (काटी), किरण पाटील (चाकाटी) यांनी सांगितले. सध्या अवकाळी पावसाचे सत्र सुरू असल्याने फळबागा उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. शेतातील ऊस पिकाला अवकाळी पाऊस उपयुक्त ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आणखी दोन-तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण दिसत आहे.

Back to top button