रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर ! आयुर्मान संपले तरी धावतात रस्त्यावर पंधरा वर्षांपुढील 244 अ‍ॅम्बुलन्स | पुढारी

रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर ! आयुर्मान संपले तरी धावतात रस्त्यावर पंधरा वर्षांपुढील 244 अ‍ॅम्बुलन्स

प्रसाद जगताप : 

पुणे : केंद्र शासनाकडून परिवहन  संवर्गातील वाहनांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे 15 वर्षांपुढील बहुतांश रुग्णवाहिका रस्त्यावर धावत आहेत. सन1989 ते 2007 पर्यंतच्या एकूण 244 रुग्णवाहिका असून, आयुर्मान संपल्यामुळे रस्त्यावर मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाकाळात रुग्णवाहिकेचे महत्त्व अनेकांना समजले आहे. रुग्णवाहिका अपुर्‍या पडल्यामुळे महापालिका प्रशासनाला अखेर पीएमपीच्या बस रुग्णवाहिका वापरासाठी रस्त्यावर काढाव्या लागल्या. त्यामुळे आगामी काळातसुध्दा पुणेकरांना पूरक आणि चांगल्या दर्जाच्या रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, ही आता प्रशासनाची जबाबदारी आहे.

रुग्णवाहिका ही परिवहन संवर्गात येते, परिवहन संवर्गातील वाहनांची वयोमर्यादा केंद्र शासनाकडून अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र, परिवहन संवर्गातील वाहनांची आम्ही सुरुवातीच्या 8 वर्षांपर्यंत दर 2 वर्षांनी फिटनेस तपासणी करतो आणि 8 वर्षांनंतर दरवर्षी वाहनाची फिटनेस तपासणी (पासिंग) केली जाते.
                                     – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

स्क्रॅप पॉलिसी खासगी वाहनांना कधी ?
केंद्र शासनाने नुकतीच स्क्रॅप पॉलिसी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व सरकारी वाहने स्क्रॅप करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे सरकारी नोंद असलेली सर्व परिवहन संवर्गातील वाहने स्क्रॅप होणार आहेत, परंतु खासगी मालकीच्या परिवहन संवर्गातील रुग्णवाहिकांची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही वाहने रस्त्यावरून कमी कधी होणार? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

रुग्णवाहिका हा भावनिक मुद्दा आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांची स्थिती कोणत्याही परिस्थितीत चांगलीच असायला हवी. मध्यंतरीच्या काळात अनेक रुग्णवाहिकांचे अपघात झाले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका या रस्त्यावर धावताना चांगल्याच असायला हव्यात. केंद्र शासनानेसुध्दा याबाबत निर्णय घ्यावा.
                     – बाबा शिंदे, अध्यक्ष, मालवाहतूक आणि ट्रान्सपोर्ट, महाराष्ट्र राज्य.

 

Back to top button