पुण्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु | पुढारी

पुण्यात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरात गुरुवारी सायंकाळी बाष्पयुक्त ढगांची गर्दी झाल्याने जोरदार पाऊसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजता सुरु झालेला पाऊस, सुसाट्याचा वारा अन विजांच्या कडकडाटासह सव्वा सात पर्यंत सुरूच होता. दरम्यान आगामी चार दिवस सायंकाळच्या वेळी असाच पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे व हिमालयात सक्रिय झालेल्या चक्रवातामुळे शहरात गेल्या दोन दिवसांपासून बाष्पयुक्त ढगांची गर्दी होत आहे. दिवसा कडक ऊन असल्याने कमाल तापमानाचा पारा ४० अंशावर गेल्याने सायंकाळी ढगांची प्रसूती होत आहे.

गुरुवारी दिवसभर पुणेकर उकाड्याने हैराण झाले. अंगाची लाही लाही होत होती. तोच सांयकाळी पाचच्या सुमारास आकाशात सूर्य तळपत असतानाच काळ्याभोर ढगांनी अंधार दाटून आला. त्यामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांचे दिवे लागले. असे वेगेळेच वातावरण शहरात तयार झाले. वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर इतका होता. त्यामुळे जोरदार कडकडाटासह पाऊस सुरु झाला. सायंकाळी पाचला सुरु झालेला पाऊस संध्याकाळी सव्वा सातपर्यंत सुरूच होता. त्यानंतरही आगामी दोन तास शहरात पाऊस पडेल, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे.

पुण्याभोवती दाटलेल्या बाष्पयुक्त ढगांचे अर्लट सायंकाळी पाचपासून हवामान विभागाने देणे सुरु केले. तसेच पाऊस किती, कसा व कुठे पडत आहे याची रडारवरील छायाचित्रे पाठवली जात होती. पावसाचा मुक्काम आणखी चार दिवस वाढला असून १७ एप्रिल पर्यंत शहराला येलो अर्लट (मुसळधार) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Back to top button