कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दांडा एकाचा, पताका दुसर्‍याची | पुढारी

कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दांडा एकाचा, पताका दुसर्‍याची

जावेद मुलाणी : 

इंदापूर : पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून देव पाण्यात घालून बसणारे, नाना भानगडी करणारे कार्यकर्ते आपण पाहात असतो. मात्र, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत वेगळेच चित्र आहे. कार्यकर्त्यांना त्यांच्याच पक्षाची गोची झाल्याचे वाटत आहे. निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दांडा एकाचा तर पताका दुसर्‍या पक्षाची आहे. उमेदवारी दाखल करूनही अनेक जण आपल्याच पक्षाचे नाव घेण्यास का धजावत नाहीत, हा देखील संशोधनाचा विषय झाला आहे.

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 157 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील 11 जणांचे अर्ज बाद झाले. एकाने माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी दाखल करणारे उमेदवार पक्षाकडून नाही तर स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांना नेमकी आपल्याच पक्षाची गोची का झाली असा प्रश्न पडला आहे. निवडणुकीच्या रिंगणात भाजप उतरली नसल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. मात्र, भाजपचे अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, पक्षाच्या वतीने अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनांचे पालन केले जाईल, असे सांगत मौन बाळगले आहे.

बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचे अनेक समर्थक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या सूचनेनुसार अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीस कोण सामोरे जाणार आहे याबाबत त्यांनी देखील काही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

तर काँग्रेस केवळ चार जागा लढविण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने एकूण आठ उमेदवारी अर्ज दाखल केले असून दि. 13 रोजी त्यांची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. शिवसेनेचे इंदापूर तालुकाप्रमुख महारुद्र पाटील यांनी इतर पक्षातील नाराजांची मोट बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. धनगर ऐक्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे यांनी क्रांतिवीर शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून बाजार समितीच्या सर्व जागा लढवण्याची
घोषणा केली. तालुक्याच्या राजकीय घडामोडी पाहता निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा मावळल्या आहेत.

Back to top button