पुणे : केलेल्या कारवाईचा आठवड्यात अहवाल द्या; आयुक्तांचा आकाशचिन्ह विभागाला आदेश | पुढारी

पुणे : केलेल्या कारवाईचा आठवड्यात अहवाल द्या; आयुक्तांचा आकाशचिन्ह विभागाला आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात सर्वत्र अनधिकृत जाहिरातबाजीचे पेव फुटले असताना महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या विभागाला कार्यवाहीचा आठवड्यात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच कार्यवाही न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. महापालिका हद्दीत फ्लेक्स किंवा होर्डिंग उभे करण्यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता शहरातील राजकीय पक्ष, स्थानिक नेते, कार्यकर्ते-पदाधिकारी यांच्याप्रमाणेच विविध स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था आदींकडून शहरात अनधिकृतपणे जाहिरात बाजी केली जाते.

यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होतेच, त्याशिवाय शहराचे विद्रूपीकरणसुद्धा होते. ’जी-20’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरात कारवाई मोहीम राबविली. मात्र, त्यानंतर कारवाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. रस्त्यांवर आणि चौकाचौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स उभे करण्यात आले आहेत. यामुळे विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी कारवाईचा अहवाल आठवड्यात देण्याचा आदेश दिला आहे. कार्यवाही न करणार्‍यांवर कारवाईचाही आदेश दिला आहे.

Back to top button