पुणे : कुणी बसायला जागा देता का ? रेल्वे स्थानक प्रवाशांचा गर्दीने हाऊसफुल्ल | पुढारी

पुणे : कुणी बसायला जागा देता का ? रेल्वे स्थानक प्रवाशांचा गर्दीने हाऊसफुल्ल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्म, प्रवेशद्वार, फूट ओव्हर ब्रीज, तिकीटघर परिसर व इतर कानाकोपर्‍यांत प्रवासी जमिनीवरच पहायला मिळत आहेत. त्यांना बसायला जागाच पुरत नसल्याने अशी स्थिती पुणे स्थानकावर निर्माण झाली आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. येथून रोज दोनशे ते अडीचशे रेल्वे गाड्या ये-जा करतात.

त्याद्वारे लाखो प्रवासी प्रवास करतात. स्थानकावर प्रवाशांना रेल्वे गाडी येईपर्यंत वाट पहावी लागते. त्यावेळी त्यांना स्थानकावर असलेल्या बाकड्यांवर जागाच मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना जमिनीवरच बसावे लागत आहे. सध्या वाढत असलेल्या उन्हाळ्यामुळे तर प्रवासी त्रस्त झाले असून, प्रशासनाने बसायला जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

प्रतीक्षालये प्रवाशांना मोफत द्या
पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या बघता त्या तुलनेत बसण्याची योग्य सोय नाही. तसेच, येथील वेटिंग रूममध्ये (प्रतीक्षालय) दर तासानुसार आकारण्यात येणारे दर देखील प्रवाशांना परवडणारे नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्लॅटस्फॉर्मवर बाकड्यांसह येथील प्रतीक्षालये मोफत उपलब्ध करावीत, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Back to top button