पुणे : पार्किंसन्स रुग्णांना मिळतोय ‘मित्रमंडळ’चा हात | पुढारी

पुणे : पार्किंसन्स रुग्णांना मिळतोय ‘मित्रमंडळ’चा हात

पुणे : पार्किंसन्स हा मेंदूचा विकार असून, रुग्णाचे (शुभार्थी) आणि केअरटेकर (शुभंकर) यांच्यामध्ये संवाद वाढावा, यासाठी सपोर्ट ग्रुपची मोठ्या प्रमाणात मदत होते. रुग्णांचे जीवन सुसह्य करण्यासाठी शरदश्चंद्र पटवर्धन व मधुसूदन शेंडे यांनी पुण्यात 22 वर्षांपूर्वी पार्किंसन्स मित्रमंडळ संस्थेची स्थापना केली. शुभार्थी आणि शुभंकर यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य जपण्यासाठी संस्था सिंहाचा वाटा उचलत आहेत.

पार्किंसन्स सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी झाल्याने आजाराबद्दल गैरसमज दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास, विचारांना योग्य दिशा मिळण्यास मदत होते. सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर इतरांचे दु:ख समजते आणि त्यांच्याशी लढण्याची उमेद मिळते, आजाराचे भय कमी होते. सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर व्यथा, अडीअडचणी सोडविण्यासाठी इतरांची मनमोकळेपणाने मदत घेऊ लागतात. पार्किंसन्ससह जगणारे शुभार्थी (रुग्ण) आणि शुभंकर (केअरटेकर) यांच्या आयुष्याची गुणवत्ता वाढवणे हे प्रमुख ध्येय ठेवून पार्किंसन्स मित्रमंडळाची नोंदणी करण्यात आली आहे.

सपोर्ट ग्रुपमध्ये अनुभवांची, विचारांची, उपचारांविषयीच्या माहितीची देवाण-घेवाण होते. व्याख्यानांमधून, चर्चासत्रांमधून पार्किंसन्सची अद्ययावत माहिती मिळण्यास व भेदरलेली अवस्था कमी होण्यास मदत होते. पार्किंसन्सग्रस्तांची काळजी घेताना घरातील सदस्यांनी स्वत:चे शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आरोग्य, छंद, आवडीनिवडी या़ंची सातत्याने जपवणूक केली पाहिजे, याकडे पार्किंसन्स मित्रमंडळाच्या विश्वस्त सदस्य अंजली महाजन यांनी लक्ष वेधले.

पटवर्धन यांच्या पत्नीला 1992 मध्ये पार्किंसन्सचे निदान झाले. रुग्णांना साहाय्य करणारा, धीर देणारा एखादा गट पुण्यात असावा, असे विचार पटवर्धन यांच्या मनात येऊ लागले. 22 ऑक्टोबर 2000 रोजी पहिली सभा पटवर्धन यांच्या निवासस्थानी झाली आणि पार्किंसन्स मित्रमंडळाची स्थापना झाली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका चर्चासत्रात पटवर्धन आणि मधुसूदन शेंडे यांची भेट झाली. दोघांनी निवेदने देऊन, पत्रके वाटून, प्रत्यक्ष भेटून 300 ते 400 पार्किंसन्स लोकांना एकत्रित केले आणि मित्रमंडळाचे काम सुरू केले. आता या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे.

                             – अंजली महाजन, विश्वस्त सदस्य, पार्किंसन्स मित्रमंडळ.

Back to top button