कात्रज डेअरीत पाच कोटींच्या अद्ययावत मशिनरी | पुढारी

कात्रज डेअरीत पाच कोटींच्या अद्ययावत मशिनरी

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा दूध संघ कात्रजने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, संघाच्या कामकाजामध्ये काटकसरीचा अवलंब करत असताना दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या अद्ययावत मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. लवकरच या यंत्रणेचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी सांगितले.

कात्रजच्या दुग्धजन्य पदार्थांना बाजारात मोठी मागणी आहे, परंतु निर्मिती क्षमता कमी असल्याने पुरवठा करण्यासाठी मर्यादा येत होत्या. प्रामुख्याने दही पॅकिंग मशीन, श्रीखंड-आम्रखंड पॅकिंग मशीन, प्रॉडक्ट पश्चरायझर, क्रीम सेपरेटर, क्रीम पॅकिंग मशीन, आइस्क्रीम फ्रिजर, कुल्फी व कँडी प्रॉडक्शन, सीआयपी सिस्टीम, ताक तसेच सुगंधी दुधाच्या पॅकिंगसाठी हायस्पीड पॅकिंग मशीन इत्यादींचा समावेश आहे.

या मशीन बसवण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपये खर्च झाले असून, एप्रिलअखेर त्याचे काम पूर्ण होईल. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमधून संघाला मोठा फायदा होणार असून उत्पादन क्षमताही वाढणार असल्याचे पवार यांनी सांगितले. काटकसरीचा उपाय म्हणून संघातील मनुष्यबळ कमी करण्याचे हेतूने नियोजन करून कंत्राटी सेवकसंख्या सुमारे 70 ने कमी केलेली आहे.

देखभाल-दुरुस्ती खर्चात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत करण्यात आली असून, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी पुणे व सर्व ग्रामीण भागात एप्रिल महिन्यात नवीन 156 मिल्कपार्लर सुरू करण्यात आली आहेत. मागील वर्षी संघाचा वकील फीसाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च झाला होता. हा खर्च कमी केला असून तो आता सुमारे 17 लाख 50 हजार रुपयांपर्यंत कमी झालेला आहे.

दूध संकलन व वितरण वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम बसविली असल्याने बोगस मार्ग व बोगस किलोमीटर लावून ज्यादा बिले घेण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. संघाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी कात्रज डेअरीचे मुख्य कार्यालय, सर्व दूध शीतकरण केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, मोबाईलवरदेखील त्याचे चित्र करून ऑनलाइन पाहता येते. पाईट दूध शीतकरण केंद्राच्या जागेला कंपाऊंड केले असून, तेथील जागा बिनशेती करण्याचे व इतर जागादेखील बिनशेती करण्याचे काम सुरू असल्याचे केशरताई पवार यांनी सांगितले.

दूध दरातील फरकाची रक्कम मिळणार
सन 2021- 22 मध्ये संघास दूध पुरवठा केलेल्या दुधास प्रतिलिटर एक रुपया दर फरक देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी 50 पैसे दिवाळीमध्ये अदा करण्यात आले आहेत. तर या महिन्यात 50 पैसे प्रमाणे दूध दर फरक अदा करण्यात येणार आहे. दूध दर फरकापोटी सुमारे 8.33 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दूध संस्थांना भाग बनवल्यावर 15 टक्के लाभांश दिला जाणार आहे.

Back to top button