तब्बल 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कोंढव्यात कारवाई | पुढारी

तब्बल 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कोंढव्यात कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोंढवा परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने वेगवेगळ्या भागात कारवाई करून पकडले. त्यांच्याकडून 46 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये ब्राऊन शुगर आणि येमेनमधील ’कॅथा इडुलिस खत’ या अमली पदार्थांचा समावेश आहे.

कोंढवा परिसरात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. त्या वेळी शाहिद अख्तरहुसेन शेख (वय 45, रा. इनामनगर, कोंढवा बुद्रुक) इनामनगर परिसरातील गल्ली क्रमांक 15 परिसरात थांबला होता. त्याच्याकडे अमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शेखला पकडले.

त्याच्याकडे असलेल्या पिशवीची तपासणी करण्यात आली. पिशवीत ब्राऊन शुगर सापडली. जप्त ब्राऊन शुगरची किंमत 40 लाख 44 हजार 800 रुपये आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पथक दोन) वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक शुभांगी नरके, शिवाजी घुले, चेतन गायकवाड, संतोष देशपांडे, संदीप जाधव, दिशा खेवलकर, योगेश मांढरे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड आदींनी ही कारवाई केली.

परदेशी बनावटीचे ‘कॅथा इडुलिस खत’
कोंढवा भागात येमेनमधील अमली पदार्थ कॅथा इडुलिस खत आणि परदेशी बनावटीच्या सिगारेटची विक्री करणार्‍या एकास अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून कॅथा इडुलिस खत आणि परदेशी बनावटीच्या सिगारेट असा पाच लाख 56 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लक्ष्मण पोलाराम सिरवी (वय 34, रा. मनीष पार्क, कोंढवा, मूळ रा. सतलाना, जोधपूर, जि. राजस्थान) याला अटक करण्यात आली.

अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पथक एक) वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, विशाल शिंदे, मनोज साळुंके, सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, राहुल जोशी, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.

Back to top button