नानगाव : जलपर्णीने व्यापले भीमा नदीचे पात्र; डासांचा प्रादुर्भाव | पुढारी

नानगाव : जलपर्णीने व्यापले भीमा नदीचे पात्र; डासांचा प्रादुर्भाव

राजेंद्र खोमणे

नानगाव : दौंड व शिरूर तालुक्यांना वरदान ठरलेल्या भीमा नदीपट्ट्यात जलपर्णी झपाट्याने वाढत आहे. सध्या नदीपात्रातील जलपर्णीला मोठ्या प्रमाणावर मोरपंखी फुले आलेली आहेत. मात्र, नागरिकांच्या आरोग्याचा धोकाही वाढला आहे. काही महिन्यांपासून नदीपात्रात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साठत होती. नदीपात्रात दोन प्रकारच्या जलपर्णी आढळून येत आहेत.

एका जलपर्णीला फुले येतात, तर दुसरीला येत नाहीत. सध्या ठिकठिकाणी नदीपात्र हिरवेगार दिसत असून, जलपर्णीची फुले मनमोहक दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांना फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. एकीकडे हे सुंदर दृश्य असले, तरी दुसरीकडे जलपर्णीमुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. सध्या या हिरव्यागार जलपर्णीत मोठ्या प्रमाणावर पांढरे व इतर प्रकारचे डास दिसून येतात. जलपर्णीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा धोका
डासांमुळे संध्याकाळी नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. डासांपासून होणार्‍या आजारांचा धोका वाढला आहे. काही दिवसांनी फुलोर्‍यातील जलपर्णी सडू लागते. नदीपात्रात जलपर्णीचे सडलेले अवशेष मिसळल्याने पाण्याला दुर्गंधी येते. ती गावात पसरून मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

Back to top button