मोशी : रम्बलरमुळे उडाली नागरिकांची झोप | पुढारी

मोशी : रम्बलरमुळे उडाली नागरिकांची झोप

मोशी : पुणे – नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने येणार्‍या वाहनांचा वेग कमी व्हावा, अपघात कमी व्हावेत, या हेतूने बसविण्यात आलेले रम्बलर तांत्रिक अभ्यास न करता चुकीच्याच ठिकाणी बसविल्याने स्थानिक नागरिकांची मात्र झोप उडाली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर भरधाव येणारी वाहने रम्बलरवरून गेल्याने रस्त्याला हादरे बसत आहेत. याचे सौम्य धक्के रस्त्यानजीकच्या घरांनादेखील बसत असून सातत्याने धक्के बसत असल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. शिवाय घरालादेखील धोका निर्माण झाला आहे.

चुकीच्या ठिकाणी आणि विशेषतः रहदारी अधिक असलेल्या ठिकाणी बसविण्यात आलेले रम्बलर तातडीने काढण्यात यावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर रस्ता दुभाजकच्या कडेला माती जमा झालेली आहे. त्यावरून घसरून दुचाकी अपघात झाले आहेत व पुढेही होण्याची शक्यता आहे. वेग नियंत्रित व्हावा, म्हणून रम्बलर स्ट्रीप पट्टे मारण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार, महामार्गावर रम्बलर पट्टे मारण्यात आले होते.

मात्र, हे मारत असताना काही पट्टे चुकीच्या ठिकाणी आणि आतांत्रिक पद्धतीने मारण्यात आले. हेच चुकीच्या पद्धतीचे रम्बलर देवदूत नसून यमदूत बनले आहेत. बनकर वस्ती व इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ नाशिकच्या बाजूने उतारावर चुकीच्या ठिकाणी रम्बलर पट्टे मारण्यात आले आहेत. या रम्बलरवर वाहने वेगाने आल्यास गतिरोधक म्हणून त्याचे काम व्हायला हवे किंवा त्याने वेगाला प्रतिरोध करायला हवा. मात्र, तसे न होता हे रम्बलर वेगाने येणार्‍या वाहनांची दिशाच फिरवत असून वाहने लेन सोडत शेजारच्या वाहनांवर आदळत आहेत. यामुळे दुचाकीस्वार किंवा शेजारच्या मोठ्या वाहनातील चालकांचा जीवदेखील धोक्यात येत आहेत. शिवाय त्याचे धक्के नजीकच्या रहिवाश्यांना त्रासदायक ठरत आहेत. यामुळे अशा चुकीच्या ठिकाणच्या रम्बलरचा सर्व्हे केला जावा व त्यात तांत्रिक दोष असल्यास त्याची दुरुस्ती केली जावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

महामार्गावर बनकर वस्तीला बसविण्यात आलेले रम्बलर चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने बसविण्यात आले आहेत. यावरून वाहने घसरून दिशाहीन होत आहेत. चालकदेखील याला काही करू शकत नाही. शिवाय नजीकच्या भागातदेखील हादरे बसत आहेत. अशा वेळी एखाद्याचा नाहक जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने तत्काळ येथील रम्बलर हटवावे.
                                                            – सुनील बनकर, स्थानिक ग्रामस्थ

Back to top button