निरा नदीच्या पाणी प्रदूषणाची होणार पाहणी | पुढारी

निरा नदीच्या पाणी प्रदूषणाची होणार पाहणी

बारामती/सांगवी; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील निरा नदीचे पाणी दूषित झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची टीम पाहणी करणार आहे. भाजपने विषयाला गांभीर्याने घेतले आहे. बारामती तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ताब्यातील साखर कारखान्यांकडे त्यांचे बोट आहे. राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यामुळेच नदी प्रदूषणाची पाहणी केली.

नदी प्रदूषणाला केवळ साखर कारखानेच जबाबदार नाहीत. बारामती, फलटण तालुक्यांतील कारखान्यांसह अन्य कंपन्याही जबाबदार आहेत. फलटण तालुक्यातील कत्तलखाने नदीचे मारेकरी बनले आहेत. रोज दीडशे जनावरांच्या कत्तलीचा परवाना असताना हजारो जनावरे मारली जात आहेत. जनावरांच्या रक्ताचे पाट ओढ्या-चार्‍यांमधून नदीत येतात. नदीत मासे, खेकडेही जिवंत राहत नसल्याची परिस्थिती आहे. नदीचे पाणी देताना शेतक-याच्या पायाला खाज सुटते. पिकांवरही परिणाम होत असून, जमिनीतील गांडूळ व इतर कृमीही मरत आहेत. त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

केंद्रीय जलमंत्री एप्रिलअखेरीस बारामतीत
बारामतीत यापूर्वी आलेले केंद्रीय जलशक्ती व अन्न सुरक्षामंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्यापर्यंत हा विषय पोचला आहे. केंद्रीय पथक पाहणीला येण्यासाठी ते ही एक कारण आहे. तसेच पटेलसुद्धा एप्रिलअखेरीस बारामतीच्या पुन्हा दौ-यावर येणार आहेत.

Back to top button