मंचर : जीपला कट बसून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार | पुढारी

मंचर : जीपला कट बसून झालेल्या अपघातात एक विद्यार्थी ठार

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  भरधाव दुचाकीचा पिकअप जीपला कट बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. भीमाशंकर-मंचर रस्त्यावरील शिनोली (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (दि. 30) सकाळी 9 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील तिघेही अवसरी खुर्द येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ओमकार उमेश सुमंत (वय 20, रा. शनिवार पेठ, सातारा) असे या अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर सागर संतोष उगले (वय 20, रा. काळजांबा, वाशिम) आणि नईम यासीद नदाफ (वय 20 रा. कोतळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

ओमकार, सागर आणि नईम हे तिघेही अवसरी खुर्द येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. ते गुरुवारी भीमाशंकर येथे फिरण्यासाठी दुचाकी (एमएच 27 बीयु 5299) वरून गेले होते. भीमाशंकर येथून मंचरकडे येत असताना शिनोली गावच्या हद्दीत समोरून येणार्‍या पिकअप जीपला (एमएच 14 एचयू 8842) भरधाव दुचाकीचा कट बसून त्यांना अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तातडीने घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच ओमकारचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर सागर उगले व नईम नदाफ यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान रवींद्र सुरकुले, नीलेश तळपे हे करत आहेत. दरम्यान या अपघातानंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गुरुवारी (दि. 30) होणारे स्नेहसंमेलन रद्द करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांनी दिली

Back to top button