पिंपरी : चौकात पाण्याची फवारणी, रस्तेही धुणार! | पुढारी

पिंपरी : चौकात पाण्याची फवारणी, रस्तेही धुणार!

पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : शहरामधील हवेतील धुळीच्या कणांचे प्रमाण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. आता, प्रदूषण कमी करण्यासाठी चौकांमध्ये पाणी फवारणीसह रस्ते पाण्याने धुण्यात येणार आहेत. दिल्लीच्या धर्तीवर ही नवीन संकल्पना शहरात राबविली जाणार आहे. या उपक्रमातून किती प्रदूषण कमी होणार हे भविष्यात कळेल.

वायू व जलप्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून नवनवीन संकल्पना राबविल्या जातात. त्यातील काही योजना बंद पडल्या आहेत. आता नवीन योजना समोर आणली आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शहरातील 5 चौकांत 13 मिस्ट टाईप वॉटर फाउंटन उभारण्यात येणार आहेत. लग्न समारंभात प्रवेशद्वारावर सुगंधी द्रव्य फवारले जाते. त्याप्रमाणे या फाउंटनचे काम असणार आहे. दर दहा मिनिटांनी हे फाउंटन पाण्याचे तुषार उडविणार आहे. चौकांच्या चारी रस्त्यांवर हे आकर्षक रचनेतील फाउंटन बसविण्यात येणार आहेत. त्याखाली 500 ते 1 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असणार आहे. या कामासाठी 3 कोटी 90 लाख खर्च अपेक्षित आहे. हा निधी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाअंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणार आहेत.
तसेच, मुव्हेबल कॅनन डस्ट सेपरेशन वाहनेही असणार आहेत. पाण्याच्या टँकरप्रमाणे असलेली ही वाहने रस्त्यांवर फिरून पाण्याचे तुषार उडविणार आहेत. अशी एकूण 5 वाहने असणार आहेत. तसेच, मोशी कचरा डेपोतील बांधकाम राडारोडा प्रकल्पातही डस्ट सेपरेशन यंत्रणा बसविली जाणारआहे. त्यासाठी 1 कोटीचा खर्च अपेक्षित आहे.

शहरातील 18 मीटर रुंदीचे सर्व रस्ते यांत्रिक पद्धतीने आठवठ्यातून एकदा पाण्याने स्वच्छ धुण्यात येणार आहेत. त्यासाठी आठ रोड वॉशर वाहने वापरण्यात येणार आहेत. रस्ते धुण्यासाठी सांडपाणी केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया केलेले वापराचे पाणी वापरले जाणार आहे. त्यासाठी 1 कोटी 75 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. रस्ते धुण्याचे काम आठ क्षेत्रीय कार्यालयानिहाय चालणार आहे. काम करणे व वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम तीन वर्षे मुदतीचे आहे. या सर्व कामासाठी पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे. या हवा शुद्ध करण्याच्या नव्या उपक्रमाची पालिकेच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणाही करण्यात आली आहे.

हवा शुद्ध करण्यासाठी शहरात बसवलेत 35 एअर फिल्टरशहरातील विविध 35 चौकांत महापालिकेने एअर फिल्टर यंत्र बसविले आहेत. हे यंत्र हवेतील दूषित हवा ओढून घेऊन शुद्ध हवा बाहेर सोडते. त्यासाठी पालिकेने केवळ वीजपुरवठा दिला आहे. ही यंत्रे सीएसआर निधीतून बसविण्यात आली आहेत. स्मार्ट सिटीच्या वतीने शहरातील 32 ठिकाणी एअर सेन्सर बसविण्यात आले आहे. त्याद्वारे हवेतील गुणवत्ता समजते. अधिक दूषित भागात हवा स्वच्छ करण्याबाबत उपाययोजनाकरण्याचे निर्देश त्या माध्यमातून उपलब्ध होतात.

वातावरणातील दूषित हवा शुद्ध करण्याचा प्रयत्न :
वातावरणात अनेक धुळी कण तरंगत असतात. ते श्वसनाद्वारे फुफ्फसात जातात. त्यामुळे गंभीर आजार होतात. वातावरणातील हे धुळीचे कण पाण्याच्या तुषारामुळे पाण्यासोबत जड होऊन खाली जाऊन बसतात. त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर पुढील महिन्यापासून शहरात राबविला जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास तो संपूर्ण शहरात राबविला जाईल, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख सहशहर प्रमुख संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

Back to top button