रत्नागिरी : कांदळवनांचे नव्याने सर्वेक्षण होणार | पुढारी

रत्नागिरी : कांदळवनांचे नव्याने सर्वेक्षण होणार

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : कोकण किनारपट्टीलगत असलेलला कांदळवनांच्या हिरव्या पट्ट्यात जमिनीच्या व्यावसायिक हव्यासापाटी होत चाललेली अतिक्रमणे रोखण्यासाठी या क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यानुसार राष्ट्रीय कांदळवन कक्षाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरला (एमआरएसएसी) कोकणातील सात जिल्ह्यांत कांदळवन क्षेत्रांचे नव्याने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या ‘ग्रीन बेल्ट’चा पर्यटनीय आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोकणातील कांदळवनांच्या क्षेत्रात असंख्य जीवांचा अधिवास आहे. कोकणात असलेला हा ठेवा आता पर्यटनाच्या द़ृष्टीनेही विकसित होत आहे. अनेक ठिकाणी खारफुटीच्या जंगलात नौकाविहार, पक्षीनिरीक्षण आदी पर्यटन विकसित करणारे घटक आहेत. त्याचबरोबर या जंगलात स्थानिकांना रोजगार मिळविण्यासाठी अनेक उपजीविकेची साधने निर्माण करण्यात येत आहेत. याबाबत उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक प्राधिकरणे कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरण करण्यास चालढकल करत आहेत. त्यामुळे या जंगलावर वन विभागाचाही ताबा 40 ते 50 टक्के आहे. काही जिल्ह्यांत सिडकोनेही खारफुटीच्या जंगलावर ताबा सोडलेला नाही. त्यामुळे आता कांदळवन कक्षाच्या आदेशानुसार महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन केंद्राद्वारे मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील किनारपट्टीचा अभ्यास करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात कांदळवनाचे क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीनेही विकसित करण्यासाठी प्रस्तावित करण्याच्या सूचना कांदळवन कक्षाला देण्यात आल्या आहेत.

खारफुटीमध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती आणि जमिनीलगत वाढणार्‍या प्रजातींचा समावेश असतो. त्यांच्या मुळांचा जमिनीवर असलेला भाग गुंतागुंतीसारखा वाटतो. ती मुळे भरतीच्या पाण्याचा वेग रोखतात. खारफुटी ही अनेक जलचरांचे आश्रय स्थान आहे. त्यामुळे आता खारफुटी जंगलाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Back to top button