पुणे बाजार समितीसाठी 297 अर्जांची विक्री | पुढारी

पुणे बाजार समितीसाठी 297 अर्जांची विक्री

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांत 297 अर्जांची विक्री झाली. त्यांपैकी 23 अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर झाले आहेत. हमाल मापाडी मतदारसंघातून 3, सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून 11, व्यापारी अडते मतदारसंघातून 9 जणांनी अर्ज सादर केले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली.

बाजार समितीच्या 24 वर्षांनी होणार्‍या निवडणुकीसाठी इच्छुकांनी अर्ज खरेदी करण्यासाठी धडाका लावला आहे. अर्जांच्या विक्रीसह ते अर्ज सादर करणार्‍या दुसर्‍या दिवशी मंगळवारी व्यापारी-अडते मतदारसंघातून माजी संचालक गणेश घुले, विलास भुजबळ यांनी प्रत्येकी दोन, तर राजेंद्र कोरपे यांनी एक अर्ज सादर केला आहे. याखेरीज, अमोल घुले यांनीही एक अर्ज सादर केला आहे. सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून लक्ष्मण केसकर, दिलीप गाडेकर, सर्वसाधारण गटातून अशोक गायकवाड, तर इतर मागासवर्गातून विकास दांगट यांनी अर्ज दाखल केले आहेत.

 

Back to top button