कोरोनावर सुधारित लस आवश्यक ; अँटिबॉडींचा प्रभाव कमी | पुढारी

कोरोनावर सुधारित लस आवश्यक ; अँटिबॉडींचा प्रभाव कमी

पुणे : सध्या कोरोना आणि एच 3 एन 2 असे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. विषाणूंमध्ये बदल झाल्याने संसर्गाची तीव—ता बदलते आणि संसर्ग होतो. सध्या अँटिबॉडीचे प्रमाण कमी झाल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. वैयक्तिक आणि सामूहिक प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सुधारित लस आवश्यक असल्याचे मत विषाणुतज्ज्ञांनी व्यक्त केले. लस घेतल्यावर शरीरात 13 ते 14 दिवसांनी अँटिबॉडी विकसित व्हायला सुरुवात होते.

लस घेतल्यापासून नऊ महिने ते एक वर्ष अँटिबॉडी टिकतात आणि त्यानंतर प्रभाव कमी होत जातो, असे गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. अनेक नागरिकांनी दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला आहे. केवळ 8 ते 9 टक्के नागरिकांनी बूस्टर घेतला आहे. त्यामुळेच प्रतिकारशक्ती कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

अमेरिकेमध्ये दरवर्षी फ्लूची लस घेतली जाते. त्याप्रमाणे पुढील किमान पाच वर्षे दरवर्षी लसीकरण गरजेचे आहे. कोरोना विषाणूमध्ये सातत्याने बदल होत आहेत. त्यानुसार लसींची परिणामकारकता कमी होते आणि अँटिबॉडी कमी होतात. त्यामुळे दरवर्षी सुधारित लस घेणे आवश्यक आहे.
                                                                – डॉ. अरविंद देशमुख

मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया लस घेऊन ठरावीक कालावधी उलटून गेल्यावर अँटिबॉडींचा प्रभाव कमी होऊ लागतो. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी चौथा डोस सुरू करणे आवश्यक आहे.
                                   – डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ

Back to top button