पुणे : ’आनंदाचा शिधा’ अजून पोहचलाच नाही ! | पुढारी

पुणे : ’आनंदाचा शिधा’ अजून पोहचलाच नाही !

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘आनंदाचा शिधा’ योजनेतील साखर आणि हरभरा डाळ मिळाली असली, तरी रवा आणि पामतेल मात्र निम्म्यापेक्षा निम्मे मिळाले आहे. ते देण्यासाठी पिशव्याही उपलब्ध नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील गोदामात हा उपलब्ध शिधा पडून आहे. गुढीपाडव्यानिमित्त मिळणारा शिधा आता कधी मिळणार, याची प्रतीक्षा नागरिक करीत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 5 लाख 61 हजार कुटुंबांना या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. साखर 97 टक्के, तुरडाळ 95 टक्के मिळाली. रवा मागणीच्या तुलनेत 58 टक्के, पामतेल 66 टक्के उपलब्ध झाले.

ते देण्यासाठीच्या पिशव्या मात्र केवळ 17 टक्केच मिळाल्या आहेत. पूर्ण शिधा प्राप्त झाल्याशिवाय वाटप करता येणार नसल्याने आलेल्या वस्तू तालुक्यातील गोदामात जमा करण्यात आल्या आहेत. स्वस्त धान्य दुकानात तो माल पोहचला नसल्याने नागरिकांना ‘आनंदाचा शिधा’ कधी मिळणार, हा प्रश्नच आहे. दरम्यान, रवा, साखर, हरभरा डाळ, पामतेल या चार वस्तू केवळ 100 रुपयांना दिल्या जाणार आहेत.
हा शिधा संच गुढीपाडव्यापूर्वी वितरित होणे आवश्यक होते. परंतु, राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा संप आणि नेमलेले पुरवठादार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शिधा मिळालेला नाही.

ज्या तालुक्यात चारही वस्तू प्राप्त झाल्या आहेत, अशा ठिकाणी दुकानदारांना वस्तू वितरित केल्या जात आहेत. 31 मार्चपूर्वी सर्व लाभार्थ्यांना शिधा संच मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली असून, जिल्ह्यातील सर्व 1 हजार 800 स्वस्त धान्य दुकानांतून शिधा वितरित केला जाणार आहे.
                                         सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

 

Back to top button