पुणे: वादग्रस्त पोलिसांना अधीक्षक दाखविणार मुख्यालयाचा रस्ता | पुढारी

पुणे: वादग्रस्त पोलिसांना अधीक्षक दाखविणार मुख्यालयाचा रस्ता

दीपक देशमुख

यवत (पुणे): पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक मुख्यालयाचा रस्ता दाखविण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी देखील पोलिस अधीक्षक सुवेज हक आणि पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी अशा वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात हजर करून घेतले होते. यापूर्वीचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार अंकित गोयल यांनी स्वीकारला आहे. त्यांनी अगदी बारकाईने जिल्हा पोलिस दलाची माहिती घेत जिल्हाभरात वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची कुंडली खात्यांतर्गत काढली आहे. लवकरच अशा वादग्रस्त पोलिसांना संबंधित पोलिस ठाण्यामधून मुख्यालयात हजर व्हावे लागू शकते.

पुणे ग्रामीण हद्दीत जवळपास 30 पेक्षा अधिक पोलिस ठाणी असून बऱ्याच पोलिस ठाण्यांमधून कोणत्या ना कोणत्या पोलिस कर्मचाऱ्याची तक्रार पोलिस अधीक्षकांना मिळत असते. याच अनुषंगाने अशा वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांना संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना सांगून खात्यांतर्गत गोपनीय माहिती मागवून मुख्यालयात हजर केले, तर याचा धडा घेऊन इतर कर्मचारी ती चूक करीत नाहीत व तक्रारदारांशी नम्रतेने वागतात; म्हणून अशी कारवाई होणे देखील गरजेचे असते. वादग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांची कुंडली तयार असून, जिल्हा पोलिस अधीक्षक कधी कारवाई करतात? व यात कोणा कोणाचा नंबर लागतो? याचीच जिल्हा पोलिस दलात सध्या चर्चा सुरू आहे.

तसेच, यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलिस ठाणी व इतर शाखांमध्ये काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली, तर त्याची त्वरित अकार्यकारी पदावर नेमणूक करीत किंवा पोलिस मुख्यालयाचा रस्ता दाखविला होता. अशीच कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल करणार, याची धास्ती पोलिस दलात लागून राहिली आहे. या स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.

Back to top button