पोस्टाने लूक बदलला ! | पुढारी

पोस्टाने लूक बदलला !

आशिष देशमुख : 

प्रेमाची अन् खुशाली विचारणारी पत्रे पाठविण्याचे प्रमाण स्मार्ट फोनमुळे जवळजवळ बंद झाले असले; तरीही पोस्टमनची कामे कमी झालेली नाहीत. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांचे नेटवर्क ग्रामीण भागात नसल्याने त्यांनी पोस्टाशी पार्सलसेवेचा करार केल्याने व्यावसायिक पत्रांचे प्रमाण तब्बल 200 पटींनी, तर स्पीड पोस्टचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढले आहे.

डाकिया डाक लाया… डाकिया डाक लाया…या गाण्यावर त्या काळातल्या सुपरस्टार राजेश खन्नाने सत्तरच्या दशकातला पोस्टमन सर्वांसमोर ताकदीने उभा केला. त्यांनर चिठ्ठी आई है आई है… चिठ्ठी आई है.. हे बॉर्डर चित्रपटातील गाणे 1990 च्या दशकातील स्थिती सांगून गेले. त्यानंतर मात्र ई-कॉमर्सचे युग आले आणि भारतीय डाक विभाग प्रचंड गतिमान झाला. स्मार्ट फोनने घराघरांत जाणार्‍या वैयक्तिक पत्रांचे प्रमाण नगण्य झाले. मात्र, व्यावसायिक पत्रांचे प्रमाण 200 पटींनी वाढले. सरकारच्या ई-सुविधा वाढल्याने पोस्ट विभागाची गतीही वाढली. स्पीड पोस्टांची गती पुणे विभागात 40 टक्क्यांनी वाढली आहे.

हे चित्र आहे पुणे शहरातील प्रधान डाक विभागाचे. तरुण पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टीमने शहरातील सेवांचा चेहरामोहराच बदलला आहे. दैनिक ‘पुढारी’ने या आधुनिक सेवांचा घेतलेला हा खास रिपोर्ट…

खुशालीची पत्रे, अर्जंट तार हे प्रकार खूप कमी झाले असले तरीही पोस्टमनप्रती प्रेम व आपुलकी पूर्वीसारखीच आहे. व्यावसायिक पत्रांचे
प्रमाण प्रचंड वाढले असले, तरीही पोस्टकार्ड इन्इन्लँडला मागणी आहे.
                                                          – आश्लेषा कोरडे, पोस्टवुमन

मला या विभागात 32 वर्षे झाली. पूर्वी मी पत्रवाटपाचे काम करीत होतो. आता सॉर्टिंग करतो. मी मोठा बदलाचा साक्षीदार आहे. वैयक्तिक पत्रे कमी झाली, तरी व्यावसायिक पत्रांचे प्रमाण वाढले आहे. चेकबुक, शासकीय पत्रे वाढली आहेत.
                                              – विनोद हिंगुळकर, सॉर्टर, मुख्य डाकघर

सर्व पदवीधरांसाठी जीवन विमा…
भारतीय डाक विभागाने कर्मचार्‍यांसाठी 1884 साली जीवन विमा सुरू केला होता. तो 1 फेब—ुवारी 2023 पासून देशातील सर्व पदवीधरांसाठी खुला करण्यात आला आहे. 19 ते 55 वर्षे ही वयोमर्यादा असून, कोणताही पदवीधर पोस्टात जाऊन अथवा पोस्टमनकडून हा विमा काढू शकतो.

पाऊल पडते पुढे..!
व्यावसायिक पत्रांचे प्रमाण 200 पटींनी वाढले
वैयक्तिक पत्रातील प्रेमाचा ओलावा घटला, तरी पोस्ट
कार्ड, इन्लँडला मागणी
पोस्टमनला ई-बाईक देण्याचा विचार, पिंपरीत पहिला प्रयोग
अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, डि-कॅथलानसह विद्यापीठांचे करार
शहरी पोस्टमनला 42000, ग्रामीण पोस्टमनला 15000 पगार
विभागात 3 हजार 484, तर शहरात 733 पोस्टमन
शहरात 190 पोस्ट ऑफिस

आधारसह पासपोर्टचे काम वाढले. इंडियो पोस्ट सेवेत बँकिंग व्यवहार आल्याने पोस्टमन आता सेव्हिंग अकाउंट, जीवन विमा काढू शकतो. स्पीड पोस्टच्या सेवेत 40 टक्के वाढ झाली आहे. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह सर्वच विद्यापीठांनी करार केल्याने व्यावसायिक पत्रे अन् पार्सल सुविधांचे प्रमाण 200 पटींनी वाढल्याने या विभागाचे चित्र पूर्ण आधुनिक झाले आहे.
                                                 – रामचंद्र जायभाये, पोस्टमास्टर जनरल

बाळाचे आधार कार्ड घरीच काढा…
पोस्टात आता आबालवृध्दांचे आधार कार्ड सहजशक्य झाले असून, ती सेवा मोफत आहे. गेल्या वर्षापासून शून्य ते पाच वर्षांच्या बालकांचे आधार कार्ड पोस्टमनदादा घरी येऊन काढून देत आहे. तुम्हाला माहीत नसेल, तर फक्त त्या दादाला आवाज द्या, तुमच्या बाळाचे आधार तो घरात येऊन काढून देईल.

लवकरच येणार ई-बाईक…
पूर्वी सर्वच पोस्टमन सायकलवर डाक वाटतात. आता मात्र 80 टक्के पोस्टमन दुचाकीचा वापर करतात. लवकरच ई-बाईक त्यांना देण्याचा विचार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चिंचवडमध्ये 6 ई-बाईकचा वापर पोस्टमन करीत आहेत.

Back to top button