कोरेगाव भीमा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुकला उद्या विविध कार्यक्रम | पुढारी

कोरेगाव भीमा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त वढू बुद्रुकला उद्या विविध कार्यक्रम

कोरेगाव भीमा : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे मंगळवारी (दि. 21) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमास राज्यातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने शंभूभक्त उपस्थित राहणार आहेत. सकाळी 6 वाजता छत्रपती संभाजी महाराज, कवी कलश व वीर शिवले यांच्या समाधीचा महाभिषेक आहे. सात वाजता मूक पदयात्रा, 8.30 वाजता जिल्हाधिकारी पुणे यांच्या हस्ते शासकीय पूजा, 9 ते 10.30 पर्यंत ह.भ.प शिरीष महाराज मोरे यांचे कीर्तन, 11.30 वाजता समाधीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, 11.45 वाजता गृहविभागातर्फे शासकीय मानवंदना, 12.05 वाजता सभा व पुरस्कार वितरण, दुपारी 2 वाजता पुरंदर ते वढू-तुळापूर पालखीचे आगमन, सायंकाळी 7 वाजता ऐतिहासिक नाटक सादर करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

मुख्य अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संस्थापक अध्यक्ष-शाहूनगरी फाउंडेशन वृषालीराजे भोसले, आमदार अशोक पवार, आमदार महेश लांडगे, आमदार नीलेश लंके, बुंदेलखंडचे महाराज छत्रसाल यांचे वंशज राजमाता दिलहर कुमारीजी आदी उपस्थित असणार आहेत. प्रमुख प्रवक्ते म्हणून अखिल भारतीय दहशतवादविरोधी संघटनेचे अध्यक्ष मनिंदरसिंह बिट्टा व ‘सुदर्शन’ दूरचित्रवाणीचे संपादक सुरेश चव्हाणके हे असणार आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी, नेतेमंडळी, आजी-माजी सरपंच, उपसरपंच तसेच पंचक्रोशीतील शंभूभक्तही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

Back to top button