पुणे : विंचवाच्या नव्या 13 प्रजातींचा शोध ; महाराष्ट्रात आढळल्या नऊ, तर अन्य राज्यांत चार | पुढारी

पुणे : विंचवाच्या नव्या 13 प्रजातींचा शोध ; महाराष्ट्रात आढळल्या नऊ, तर अन्य राज्यांत चार

सुनील जगताप : 

पुणे : पर्यावरणीय परिसंस्थेत विंचू हे कीटकनियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामधील काही प्रजाती या जहाल विषारी असतात, तर काही प्रजातींचे विष हे सौम्य प्रकारचे असते. त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्तांवर तयार करण्यात येणार्‍या औषधांमध्ये विंचवाच्या विषाचा उपयोग केला जातो. विंचवाचे महत्त्व ओळखून ई-सर्च पर्यावरण सोल्युशन्सच्या वतीने 13 नव्या प्रजातींचा शोध लावण्यात आला आहे.

ई-सर्च पर्यावरण सोल्युशन्स या संस्थेचे सहा सदस्य सन 2020 पासून या प्रजातींच्या शोधामध्ये आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, फलटण, अहमदनगर, वरंधा घाट, नाशिक, विशाळगड-कोल्हापूर, ताम्हिणी घाट या ठिकाणी नव्या विंचवाच्या 13 प्रजातींचा शोध लागला आहे. शौरी सुलाखे, शुभंकर देशपांडे, देशभूषण बस्टावडे या शास्त्रज्ञांसह गौरांग गोवांडे, निखिल दांडेकर, मकरंद केतकर या सहा जणांच्या टीमने या नव्या 13 विंचवाच्या प्रजाती शोधून काढल्या आहेत. यासंदर्भातील निबंधही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिध्द झाला असल्याची माहिती शौरी सुलाखे यांनी दिली.

प्रजातींमधील वैविध्य…
रंग, शेपटीवरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह या प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून, ती माळराने, झुडपी जंगले, खडक, झाडाची खोडं व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते.

या आहेत नव्या प्रजाती
(झाडांच्या बुंध्यावर वास्तव्य)
आयसोमेट्रस – ताम्हिणी घाट, महाराष्ट्र
आयसोमेट्रस – आंबोली, महाराष्ट्र
आयसोमेट्रस कोवारीकी – चिक्कदुन्नासंद्र, बंगळुरू, कर्नाटक
आयसोमेट्रस नक्षत्र – कदमने टी इस्टेट, सकलेशपूर, कर्नाटक
आयसोमेट्रस वायनाडेन्सिस – वायनाड, केरळ
इस्मोमेट्रस लाँगीटेशन – चेंगलपट्टू – थिरुपुरूर रोड, चांगलपट्टू जिल्हा, तामिळनाडू
(खडकांच्या कपारीत राहणारे)
स्कॉर्पिओप्स फलटनेन्सिस – असराईदेवी
मंदिर, फलटण
विंचू तेलबैला – साल्टर खिंड, आंबवणे गावाजवळ, पुणे जिल्हा
स्कॉर्पिओप्स व—ुश्चिक – खिरेश्वर गाव, हरिश्चंद्रगड किल्ल्याजवळ, अहमदनगर जिल्हा
स्कॉर्पिओप्स नागफणळ – निगडाळे गाव, भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याजवळ, महाराष्ट्र
विंचू निरा – वरंधा घाट, पुणे जिल्हा, महाराष्ट्र
स्कॉर्पिओप्स लिओनेली – पारधडी गाव, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र
चिरोमाक्टेस पराक्रमी – आंबाघाट, विशाळगड रस्ता, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र

Back to top button