पुणे : कुरकुंभ घाटातील रस्त्याचे काम रखडले | पुढारी

पुणे : कुरकुंभ घाटातील रस्त्याचे काम रखडले

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : कुरकुंभ (ता. दौंड) घाटातील रस्त्याच्या कामात तब्बल 15 दिवस वाहनांचा अडथळा नसताना देखील हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पंधरा दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येणार होते. सध्या येथील काम सुरू असले, तरी रस्ता वाहतुकीसाठी नेमका खुला कधी होईल? याबाबत संदिग्धता आहे. याबाबत प्रवासी व वाहनचालकांकडून संताप व्यक्त होत आहे. मनमाड-बेळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कुरकुंभ हद्दीतील घाटातील रस्त्याच्या कामाला तब्बल अडीच वर्षांनंतर सुरुवात झाली. खडी मशिन ते एमआयडीसी कॉलनी रस्त्याचे काम सुरू केले. मात्र, वाहनांचा अडथळा होत असल्याने काम करता येत नाही, असे कारण पुढे करून कुरकुंभ-दौंड रस्ता पंधरा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याबाबत रस्ते विकास महामंडळाने दौंड पोलिस ठाण्यात पत्र दिले होते. 3 मार्चपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. शुक्रवारी (दि. 17) घाट ते पेट्रोल पंप यादरम्यान फक्त एका बाजूचे डांबरीकरण झाले होते. दुसर्‍या टप्प्यातील खडी मशिन ते घाटाचा चढ येथपर्यंत फक्त मुरूम टाकून रस्ता एकसमान करण्यात आला आहे. त्यापुढील कोणतेही काम अद्याप झालेले नाही. हे काम मुदतीत पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु, ते पूर्ण केले नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणा मनमानी पध्दतीने काम करीत असल्याची पुन्हा चर्चा आहे. या पध्दतीने काम सुरू राहिले, तर महिनाभर रस्ता बंद ठेवावा लागण्याची शक्यता आहे.

Back to top button