पुणे : आम्ही मुक्काम करतो, तिथे तरी स्वच्छता ठेवा ; एसटीचालकांची अपेक्षा | पुढारी

पुणे : आम्ही मुक्काम करतो, तिथे तरी स्वच्छता ठेवा ; एसटीचालकांची अपेक्षा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  स्वच्छतागृहांची दुरवस्था… तुटलेल्या भिंती… जुनाट वीजयंत्रणा… भिंतींचे पोपडे निघालेले… आरसे तुटलेले… नळांना पाणीच नाही… इमारतीच्या भिंतीतच मुरणारे स्वच्छतागृहाचे पाणी… अशा मरणासन्न इमारतीत एसटी प्रशासन मुक्कामी चालकांच्या जिवाशी खेळत आहे. पुणे रेल्वेस्थानकाशेजारीच एसटीचे स्थानक आहे. याला लागूनच असलेल्या जुन्या इमारतीमध्ये चालकांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. मात्र, येथे अत्यंत दयनीय अवस्था असून, एसटी प्रशासन अक्षरश: चालकांच्या जिवाशी खेळ करीत आहे. चालकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एसटी प्रशासनाने येथे चालकांना राहण्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

दुर्घटना घडण्याची शक्यता
पुणे स्टेशन येथील एसटी कार्यालयाच्या इमारतीची खूपच दुरवस्था झाली असून, बाहेरून पाहिले तर ही इमारत पडायला आल्याप्रमाणे दिसत आहे. सांडपाणी भिंतीमध्येच मुरत आहे.

बाहेरगावावरून येणार्‍या आमच्यासारख्या चालकांना येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, येथे खूपच दयनीय अवस्था आहे. पाणी येत नाही, सारखीच लाईट जाते, आतमध्ये दुर्गंधी आहे. स्वच्छतागृहांच्या फरशा तुटल्या असून, त्यांची अवस्था खराब आहे. इलेक्ट्रिक बटनही खराब आहेत. अशी सुविधा देऊन प्रशासन आमच्या जिवाशी खेळत आहे.
                                                                                                   – एक चालक

Back to top button