पिंपरी : मॅफेड्रोन विक्रीप्रकरणी नायजेरियन अटकेत | पुढारी

पिंपरी : मॅफेड्रोन विक्रीप्रकरणी नायजेरियन अटकेत

पिंपरी : मॅफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन व्यक्तीस अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून मेफेड्रोनसह सव्वालाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 13) करण्यात आली. बनकोले युसुफ ओओलाबी (24, रा. मोरया पार्क, सांगवी. मूळ रा. ए नंबर 2 ओशीडी, लोगोस, नायजेरिया) असे अटक केलेल्याचे नाव आहे.याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी त्यांना सांगवी परिसरात राहणारा नायजेरियन मॅफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोन टीम बनवून सापळा लावला. दरम्यान, एकजण संशयितरित्या दुचाकीवरून तेथे आला. मात्र, पोलिसांचा सुगावा लागताच तो पळून जाऊ लागला. त्या वेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 68 हजारांचा 17 ग्रॅम मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी अंमली पदार्थ आणि दुचाकी असा एक लाख 28 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया,अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार, उपनिरीक्षक राजन महाडीक, प्रदीप शेलार, संदीप पाटील, मितेश यादव, अशोक गारगोटे, बाळासाहेब सूर्यवंशी, पांडुरंग फुंदे यांनी केली.

Back to top button