पुणे : ‘ईडी’विरोधात जेलभरो आंदोलन करणार : सुषमा अंधारे | पुढारी

पुणे : ‘ईडी’विरोधात जेलभरो आंदोलन करणार : सुषमा अंधारे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार किरीट सोमय्या हे वेळोवेळी पत्रकार परिषद घेत ईडीच्या कारवायांबाबत अगोदरच माहिती देतात. त्यामुळे तेच ‘ईडी’चे प्रमुख झालेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ईडीकडून सातत्याने फक्त विरोधी पक्षातील लोकांनाच लक्ष्य केले जात आहे. विरोधकांवर धाडी टाकून आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडीवरोधात राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच ईडीला कोर्टात खेचणार, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. शिवसेना (ठाकरे) पक्ष कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. त्या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, आनंद भोईर उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, ’जेलभरो आंदोलनासंदर्भात वरिष्ठ पातळीवर महाविकास आघाडी पदाधिकार्‍यांसोबतही चर्चा सुरू आहे. सोमय्या, हे राजकारणी कमी आणि माहिती अधिकारी म्हणून मोठे आहेत.

त्यांनी आर्थिक घोटाळा उघडकीस आणण्यासाठी यापूर्वी प्रताप सरनाईक, आनंद आडसूळ, भावना गवळी, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध रान पेटवले होते. आर्थिक घोटाळा बाहेर काढण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध 22 पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी यांच्यासाठी 8, यशवंत जाधव यांच्यासाठी 16, अर्जुन खोतकरांसाठी 9 पत्रकार परिषदा घेतल्या. मात्र, आता संबंधित नेत्यांनी पक्ष बदलत भाजप प्रवेश केला. यावर सोमय्या शांत कसे? देशातील स्वायत्त संस्थांच्या गैरवापराबद्दल विविध पक्षांच्या 9 प्रमुखांनी पंतप्रधानांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याचे उत्तर मिळाले नाही.

हा अधिकारी 9 वर्षांपासून एकाच जागेवर
ईडीच्या सर्व कारवायाबद्दल किरीट सोमय्या यांना कशी माहिती मिळते. रत्नागिरीमध्ये 2 हजार 60 अनधिकृत बांधकामे आहेत. ही सगळी बांधकामे पडणार का? ईडीचे अधिकारी सत्यव्रत कुमार हे 2014 ते 2023 कालावधीत सुमारे 9 वर्षे एकाच ठिकाणी काम करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर कोणालाच आक्षेप नाही का?, एकाच ठिकाणी एवढी वर्षे काम करता येते का?, केंद्र सरकारकडून संबंधित अधिकार्‍याला वरदहस्त आहे का?, असा सवाल अंधारे यांनी केला.

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी प्राधान्य द्यावे
राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली, तर कांद्याचा भाव रद्दीच्या भावापेक्षाही कमी आहे. त्यामुळे शिंदे -फडणवीस सरकारने शेतकर्‍यांचे दुःख समजून घेत मार्ग काढावा. त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशीही मागणी अंधारे यांनी केली.

Back to top button