जेजुरीतील शासकीय विश्रामगृहाचे काम पूर्णत्वाकडे | पुढारी

जेजुरीतील शासकीय विश्रामगृहाचे काम पूर्णत्वाकडे

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शासकीय विश्रामगृहाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक भव्य प्रासादासारखे उत्कृष्ट बांधकाम असणार्‍या या विश्रामगृहामुळे जेजुरीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. येत्या सहा महिन्यांत या विश्रामगृहाचे काम पूर्ण होणार आहे.

जेजुरीचा श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत. देवदर्शन व कुलधर्म कुलाचारासाठी वर्षाकाठी येथे 50 लाखांहून अधिक भाविक येतात. आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी यांचीही वर्दळ येथे मोठ्या प्रमाणात असते. जेजुरी बसस्थानक परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. पूर्वी केवळ दोन सूट असणारे हे विश्रामगृह अपुरे पडत होते. जुने विश्रामगृह पाडून अद्ययावत अशा विश्रामगृहाच्या इमारतीचे काम मार्च 2022 मध्ये सुरू करण्यात आले आहे.

सुमारे 5 कोटी 71 लाख रुपये खर्चून साडेसतरा हजार स्क्वेअर फूट बांधकाम असणार्‍या या इमारतीत 4 व्हीआयपी सूट, तर 8 साधारण सूट असणार आहेत. जेजुरी गडाच्या अनुषंगाने या इमारतीचे डिझाईन ऐतिहासिक प्रासादासारखे आहे. या इमारतीत राहण्याच्या व्यवस्थेबरोबरच किचन, डायनिंग हॉल, कार्यक्रमासाठी हॉलची व्यवस्था आहे. राज्यातील एक उत्कृष्ट शासकीय विश्रामगृहाची इमारत जेजुरीत उभी राहत आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, आतील फ्लोरिंग, फर्निचर, रंगरंगोटी आदी कामे सुरू आहेत. सहा महिन्यांच्या आत या विश्रामगृहाचे काम पूर्ण होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष चौरे यांनी सांगितले.

Back to top button