पिंपरी : सीएनजी वाहनांकडे ग्राहकांची पाठ | पुढारी

पिंपरी : सीएनजी वाहनांकडे ग्राहकांची पाठ

राहुल हातोले : 

पिंपरी :  डिझेलप्रमाणेच सीएनजीचे दरदेखील वाढलेले आहेत. डिझेल प्रतिलिटर 92 रुपये सीएनजी- 92 रुपये झाला आहे. सीएनजीच्या वाढत्या दरामुळे नागरिकांनी सीएनजी वाहनांच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. सीएनजी रूपांतरीत वाहनांची संख्याही घटली असून, नागरिक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत आहेत. सीएनजीचा दर हा डिझेलच्या दराच्या बरोबरीला आला आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सीएनजीचा दर 66 रुपये प्रतिकिलो होता. तो यंदाच्या मार्चमध्ये 92 रुपये प्रतिकिलो झाला आहे. गेल्या वर्षभरात 26 रुपये प्रतिकिलो दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर सीएनजीचे दर पेट्रोल डिझेलच्या तुलनेत कमी असताना महिन्याकाठी सुमारे तीनशे ते चारशे वाहनांचे रूपांतरण सीएनजीमध्ये करण्यासाठी येत होते.

जानेवारी 2023 मध्ये केवळ 42 वाहनांचे रूपांतर करण्यासाठी अर्ज आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या सर्वांमुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीपेक्षा इलेक्ट्रिक वाहन खरेदीस नागरिक प्राधान्य देत आहेत, अशी माहिती मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिली. सीएनजी वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा दर किलोमीटरचा खर्च खूप कमी येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास पसंती देत असल्याचे दिसून येते.

सीएनजीच्या दरामध्ये सतत वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरानुसारच सीएनजीचा दरही वाढत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाहनांचे कन्व्हर्जनदेखील कमी झाले आहे. यापेक्षा नागरिकांची इलेक्ट्रिक वाहनांना अधिक पसंती आहे.
                         – मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिं. चिं.

आऊटलेट कमी असल्याने ग्राहकांना मनस्ताप
शहरातील सीएनजी केंद्रांवरील आउटलेट अनेकदा बंद असतात. मोशी येथील केंद्रावरील बारा आउटलेटपैकी केवळ नऊच आउटलेट सुरू असून, इतर तीन बंद आहेत. त्यामुळे केंद्रांवर वाहनांची गर्दी वाढत असून, वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Back to top button