चाकण : अपहृत सहा वर्षांच्या चिमुरड्याची तब्बल 17 दिवसांनी सुटका | पुढारी

चाकण : अपहृत सहा वर्षांच्या चिमुरड्याची तब्बल 17 दिवसांनी सुटका

चाकण(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : चाकणमधून सहा वर्षांच्या चिमुकल्याचे अपहरण करणार्‍या आरोपीस चाकण पोलिसांनी गजाआड केले असून, अपहरण केलेल्या बालकाची तब्बल 17 दिवसांनी सुखरूप सुटका केली आहे. पारख उमेश सूर्यवंशी असे मुलाचे नाव असून, सुरेश ऊर्फ सुर्‍या लक्ष्मण वाघमारे (वय 45, रा. पठारवाडी, चाकण, ता. खेड; मूळ रा. देवघर, वाकसई, ता. मावळ) या आरोपीस पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पारखची आई अश्विनी यांनी चाकण पोलिस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार 23 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती.

पारख 22 फेब्रुवारी रोजी आगरकरवाडी रस्त्यावरील मोकळ्या जागेत खेळत असताना कोणीतरी त्याचे अपहरण करून पळवून नेले, असे या तक्रारीत त्यांनी नमूद केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परिमंडल 1 चे पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांनी चाकण पोलिसांच्या तपास पथकास पारखचा आणि आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले.

तपास पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळ परिसरातील तसेच घटनास्थळावर येणार्‍या-जाणार्‍या रस्त्यावरील, त्याचप्रमाणे चाकण परिसरातील सुमारे 100 पेक्षा जास्त ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्या वेळी लक्षात आले की, सदर गुन्ह्यातील अपहृत बालकास सुरेश वाघमारे या फिरस्त्याने पळविले आहे. सुरेश वाघमारेची काहीच माहिती पोलिसांना मिळत नव्हती. परंतु, पोलिसांनी चिकाटीने तपास
सुरू ठेवला.

पारख आणि वाघमारे यांचे फोटो पोलिसांनी प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया तसेच पत्रकाव्दारे सर्वत्र पाठविले तसेच पुणे, ठाणे, रायगड, अहमदनगर जिल्ह्यांतील रेल्वे स्टेशन, बसस्थानकांमध्ये भित्तिपत्रके चिकटवून आरोपी व अपहृत बालकाची माहिती मिळाल्यास पोलिसांना माहिती देण्याबाबत प्रसिध्दी दिली होती. पोलिसांचे खबरेही कामाला लागले होते.

लोणावळा येथे जाऊनही चाकण पोलिसांच्या पथकाने शोध घेतला होता. तपास पथक कसोशीने शोध घेत असतानाच शुक्रवारी (10 मार्च) वेहरगाव (ता. मावळ) येथील पोलिस पाटील अनिल पडवळ यांनी सहायक निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड व सहायक फौजदार सुरेश ऊर्फ पप्पू हिंगे यांना माहिती दिली की, पारख आणि वाघमारे कार्ला (ता. मावळ) येथे दिसत आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करीत कार्ला गाठले आणि वाघमारेच्या ताब्यातून पारखची सुटका केली आणि वाघमारेला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पारखला त्याच्या पालकांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त परिमंडल 1 चे विवेक पाटील, सहायक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, हवालदार राजू जाधव, संदीप सोनवणे, नाईक हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, जवान नितीन गुंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, सुनील भागवत, चेतन गायकर यांनी ही कामगिरी केली आहे.

Back to top button