कात्रज-कोंढवा रस्त्याची दुरुस्ती अखेर सुरू; नागरिकांना दिलासा | पुढारी

कात्रज-कोंढवा रस्त्याची दुरुस्ती अखेर सुरू; नागरिकांना दिलासा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूसंपादनाच्या कचाट्यात अडकलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेकडून ताब्यात असलेल्या जागेचा वापर करून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शक्य असेल तेथे रस्ता रुंद, रस्तादुभाजक (डिव्हायडर), साइडपट्ट्यांबरोबर पॅच मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने सहापदरी रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, आवश्यक भूसंपादन झालेले नसतानाही निविदा प्रक्रिया राबवून विधानसभा निवडणुकीपूर्वी भूमिपूजन करण्यात आले. चार किलोमीटरच्या रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रश्न गेल्या साडेचार वर्षांपासून सुटू शकला नाही, त्यामुळे आतापर्यंत केवळ एक किलोमीटर लांबीचे काम तेही टप्प्याटप्प्यामध्ये झाले आहे. भूसंपादनाच्या या अडचणींमुळे रस्त्याची प्रस्तावित रुंदी 84 वरून 40 मीटर आणि नंतर 54 मीटर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भूसंपादनासाठी महापालिकेला 277 कोटी रुपयांची गरज असून, राज्य शासनाकडे 200 कोटींची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, रस्त्यासाठी एफएसआय आणि टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) पोटी जागा देण्यास तयार झालेल्या जागामालकांकडून रोख मोबदल्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे महापालिकेने उपलब्ध जागेचा वापर करून उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू आहे. खडीमशिन चौकापर्यंत या रस्त्यावर अनेक गल्लीबोळ आहेत. या रस्त्यावरून वळणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. यावर उपाय म्हणून रस्त्यावर प्रत्येक 200 मीटर अंतरावर वाहनांना वळसा घालण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Back to top button