पुणे: ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास | पुढारी

पुणे: 'दगडूशेठ' गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे, पुढारी वृत्तसेवा: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील शेतकर्‍यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित 2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, विलास शिंदे उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. द्राक्षाच्या हंगामात सलग दुसर्‍या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात आणि संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरिता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. हवामानातील बदलांमुळे तसेच बाजारभाव पडल्यामुळे द्राक्ष शेती सध्या संकटाच्या काळातून जात आहे. श्री गणेशाला यानिमित्ताने शेतकर्‍यांच्या वतीने साकडे घालण्यात आले.

Back to top button