पिंपळे गुरव : स्मार्ट सिटीतील कामांना मुहूर्त कधी? | पुढारी

पिंपळे गुरव : स्मार्ट सिटीतील कामांना मुहूर्त कधी?

पिंपळे गुरव : नवी सांंगवी, पिंपळे गुरव परिसरात स्मार्ट सिटी कामे अर्धवट राहिल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील नागरिकांसाठी नवीन पदपथ तयार करण्यात आले आहेत. परंतु, दोन महिन्यांतच या पदपथाची दुरवस्था झालेली असल्याने स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट काम कधी होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील पदपथाची महिन्यातच दुरवस्था झाली आहे. नवी सांगवीतील नर्मदा गार्डन रस्त्यालगतचे पदपथ खचलेले व उखडलेल्या अवस्थेत आहेत. याच भागातील काही पदपथाचे काम अर्धवट असल्याचे दिसत आहे.

स्थानिक नागरिक त्रस्त्र
नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम काही अंशी पूर्ण झाले आहे. परंतु, पिंपळे गुरव परिसरातील गुरुदत्तनगरपासून रामकृष्ण मंगल कार्यालयापर्यंतच्या अंतर्गत रस्त्याचे काम अजूनही रखडले आहे. चार महिन्यांपूर्वी ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. लाईन टाकण्याचे काम झाल्यावर खोदलेले रस्ते तसेच राहिल्याने याभागात मोठ्या प्रमाणत माती, धुळीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.

काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी
गणेशनगर भागातील विजय राज कॉलनी, भीमाशंकर कॉलनी, मोरया पार्क, अमृता कॉलनी भागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम अजून रखडलेले आहे. मातीच्या रस्त्यातूनच नागरिकांना वाट काढावी लागत आहे. पावसाळा सुरू होण्याच्या आधी काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांतून केली जात आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून गणेशनगर भागातील अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. दररोज या रस्त्यावर धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. पदपथ नवीन असून काही ठिकाणी उखडलेले आहेत.
                                               – डॉ. महादेव रोकडे, स्थानिक रहिवाशी

Back to top button