खेड शिवापूर : महिला दिन वर्षभर साजरा करावा : खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन | पुढारी

खेड शिवापूर : महिला दिन वर्षभर साजरा करावा : खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : मजागतिक महिला दिनानमित्त आज अनेक महिला उपस्थित आहेत, त्यामुळे महिलांची ही गर्दी पाहून मला आनंद होत आहे. मात्र, एका दिवसात महिलांचे सर्वच प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी माणुसकीचे दर्शन घडले तर 365 दिवस महिला दिन साजरा होणे आवश्यक आहे,फ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. शिवापूर ते खोपी या दोन तालुक्यांना जोडणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी खडकवासला विधानसभा अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, शुक्राचार्य वांजळे, जिल्हा परिषद बाल कल्याण समितीच्या माजी सभापती पूजा पारगे, माजी सदस्य नवनाथ पारगे, सरपंच सतीश दिघे, उपसरपंच राजू सट्टे, माजी उपसरपंच मेघा दिघे व आण्णा दिघे, सदस्य सविता धोंडे, रेणुका धोंडे, मोनिका चांडगे, बाबा तांगडे, माजी सदस्य प्रवीण धोंडे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष नाना धोंडे व दिगंबर दिघे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश दिघे, अशोक गोगावले, जितेंद्र कोंडे, राजेंद्र पवार, सोमनाथ धोंडे, स्वप्नील धोंडे आदी उपस्थित होते.

खा. सुळे म्हणाल्या, सरकार कोणाचेही असो, निधी देताना आम्ही कधी दुजाभाव करीत नाही. या भागात राष्ट्रवादी काँग्रेसने पूजा पारगे व नवनाथ पारगे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा सर्वात जास्त निधी दिला, ही अभिमानास्पद बाब आहे. जगामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा तुटवडा निर्माण झाला आहे. आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी कमी भावामुळे कांदा रस्त्यावर फेकून देऊ लागला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यात सुरू करण्याची गरज आहे. मात्र, हे सरकार हा निर्णय का घेत नाही, हे मात्र न समजणारे कोडे आहे, हा प्रश्न खा. सुळे यांनी या वेळी उपस्थित केला.

शिवगंगा खोर्‍यात लवकरच क्रीडांगण
शिवगंगा खोर्‍यात शिवापूर (ता. हवेली) या गावाला मोठ्या प्रमाणात गायरान उपलब्ध आहे, त्यामुळे दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू राजू मुजावर व माजी उपसरपंच आण्णा दिघे हे शिवगंगा खोर्‍यातील खेळाडूंसाठी क्रीडांगण व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षांपासून शासनाचा पाठपुरावा करीत असल्याचे खा. सुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. खा. सुळे यांनी तत्काळ जिल्हाधिका-यांशी संपर्क साधून चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेने जागा व निधीची मागणी केल्यास तो प्रश्न सुटेल. यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Back to top button