बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी 253 कोटींची निविदा | पुढारी

बालभारती-पौड फाटा रस्त्यासाठी 253 कोटींची निविदा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामासाठी 252 कोटी 13 लाख रुपयांची निविदा महापालिका सोमवारी काढणार आहे. हा रस्ता 2 किलोमीटर 100 मीटर असून, 30 मीटर रुंदीचा उन्नत रस्ता (उड्डाणपूल) असणार आहे.
कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता या तीन रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महापालिकेने बालभारती ते पौड रोड या मार्गाचे नियोजन करण्यात येणार आहे. या मार्गाची चर्चा वीस वर्षांपासून सुरू आहे. या मार्गासाठी चालू अंदाजपत्रकात तरतूद केली होती.

हा मार्ग हनुमान टेकडी आणि एआरएआय टेकडीच्या भागातून जाणार आहे. या भागात जमिनीखाली भूजलक्षेत्राचे प्रमाण अधिक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर वनसंपदा असल्याने कामासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यामुळे या भागातील जैवविविधतेला धोका पोहोचेल, अशा विविध कारणांमुळे पर्यावरणप्रेमींकडून त्यास विरोध होत आहे; परंतु या मार्गाला पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांकडून विरोध असल्याने प्रत्यक्ष काम सुरू करण्यात अडचणी येत आहेत. यासंदर्भात महापालिकेने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांच्या बैठकाही घेतल्या आहेत. त्यानंतर या रस्त्याच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला. त्यानंतर या रस्त्याच्या कामाचे पूर्वगणन पत्रक तयार करण्यात आले. आता हा खर्च 252 कोटी 13 लाखांपर्यंत गेला आहे. या रस्त्याच्या कामाची निविदा येत्या सोमवारी काढण्यात येणार आहे.

…असा असेल रस्ता
रस्त्याची लांबी : 2.1 किलोमीटर
रस्त्याची रुंदी : 30 मीटर
अंदाजे खर्च : 252 कोटी 13 लाख

मार्ग बदलल्याने 16 कोटीने वाढला खर्च
बालभारती ते पौड रस्ता या रस्त्यासाठी 236 कोटी रूपये खर्च पुणे महापालिकेने अपेक्षित धरला होता. मात्र, एका बांधकाम व्यवसायिकाची जागा वाचविण्यासाठी बालभारती ते पौड रस्त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला. त्यामुळे या रस्त्याच्या कामाचा खर्च 16 कोटी रूपयांनी वाढला. आता या रस्त्याचे पूर्वगणनपत्रक 252 कोटी 13 लाख रूपये इतके झाले आहे.

शहरातील बहुचर्चित बालभारती ते पौड फाटा रस्त्याच्या कामासाठी 252 कोटी 13 लाख रुपयांची निविदा महापालिका सोमवारी काढणार आहे.

                                                                        – व्ही. जी. कुलकर्णी,
                                                                पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

Back to top button